February 9, 2026

आरोग्य जनजागृती उपक्रमांना गती देण्यासाठी आढावा बैठक

  • धाराशिव (जिमाका) – राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात,यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग,पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विस्तार व माध्यम अधिकारी (डेमो) उपस्थित होते.
    राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर,सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार बैठकीला उपस्थित होते.यावेळी राज्यातील आरोग्य जनजागृती उपक्रम, जनसंपर्क मोहिमा तसेच माध्यमांशी प्रभावी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली.
    संचालक डॉ.कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम जनतेत पोहोचविण्यासाठी नावीन्यपूर्ण माध्यम धोरण आखण्याची सूचना केली.त्यांनी सांगितले की,आरोग्यविषयक माहिती जनसामान्यांना सुलभ भाषेत आणि आकर्षक पद्धतीने दिली गेल्यास त्यांचा आरोग्यविषयक जागरूकतेत मोठी भर पडेल.प्रसारमाध्यमांशी सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संपर्क राखणे,तसेच आरोग्याशी संबंधित नकारात्मक किंवा गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्यांना योग्य प्रत्युत्तर देऊन तथ्य मांडणे,याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
    तसेच,सर्व जिल्हा माध्यम अधिकार्‍यांना समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देत, विभागाच्या अधिकृत समाज माध्यम खात्यांवरील फॉलोअर्स वाढविण्यासाठी समन्वयित प्रयत्न करावेत,अशी सूचनाही त्यांनी केली.
    “आरोग्य जनजागृती हा केवळ विभागाचा कार्यक्रम नसून तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने त्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे,”अशी अपेक्षा बैठकीचा समारोप करताना डॉ.बाविस्कर यांनी व्यक्त केली.
    या बैठकीत जिल्हास्तरावर राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांचे अनुभव,अडचणी व यशोगाथा यांची देवाणघेवाण करण्यात आली.आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर माहिती-प्रसार मोहिमा अधिक सशक्त करण्यावर भर देण्यात आला.
error: Content is protected !!