February 8, 2026

भारतीय महिलांनी दाखवलं:स्वप्नं जर मनापासून पाहिली,तर सीमा काहीच नाहीत

  • हॉलीवूडच्या झगमगाटात भारतीय लेकींचं तेज झळकलेलं पाहून प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानाने भरून आलं. ज्या स्वप्नांची पायवाट कधी फक्त स्वप्ननगरीपर्यंत सीमित होती, ती आज वास्तवात उतरताना दिसते आहे. कला, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’ आणि साकार केलं ते अधुरं स्वप्न, जे आज प्रत्येक भारतीय डोळ्यात चमकतं आहे. झगमगत्या मंचावर जेव्हा भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने विजयी जल्लोष साजरा केला, तेव्हा संपूर्ण भारताने श्वास रोखून तो क्षण अनुभवला. कधी केवळ पुरुषप्रधान खेळ मानला जाणारा क्रिकेट आज स्त्रियांच्या घामाने, संघर्षाने आणि आत्मविश्वासाने नव्या अर्थाने उजळला आहे.
    ही केवळ विजयी धाव नव्हती तर ती होती अनेक दशकांच्या मेहनतीची, समाजाच्या शंकेची आणि स्वतःवरच्या न संपणाऱ्या विश्वासाची फळं. ‘भारताच्या लेकींनी जग जिंकलं’ हे वाक्य आता फक्त एक शीर्षक राहिलेलं नाही, तर ते एक घोषणा बनलं आहे. भारतीय स्त्रीशक्तीच्या अमर पराक्रमाची! मिथक तोडणाऱ्या या खेळाडूंनी दाखवलं की, कसोटी मैदानावर असो की जीवनात, धैर्य आणि चिकाटीचं बॅटिंग केलं तर कोणतीही डावसंख्या जिंकता येते. जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ ट्रॉफीच नाही जिंकली, तर असंख्य मुलींची स्वप्नं साकार केली. जगभरात भारताचं नाव उजळवणाऱ्या या लेकी अभिमान, प्रेरणा आणि संघर्षाचं प्रतीक. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह २५ वर्षानंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार हे आधीच ठरलं होतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न साकार केले.
    नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. शफाली वर्माच्यासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करत शेवटी बाजी मारली. २००५ आणि २०१७ मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं स्वप्ननगरीत साकार करून दाखवलं. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होते, पण दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला अन् अमनजोत कौरनं तिसऱ्या प्रयत्नात कॅच पूर्ण करत तिसऱ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला. दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला टीम इंडिया अजिंक्य झाली आणि शेवटी भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’ स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न केले साकार!
    2007 साली प्रदर्शित झालेल्या चक दे! इंडिया या चित्रपटात शाहरुख खाननं साकारलेला कोच कबीर खान हा पात्र खऱ्या आयुष्यातल्या एका घटनेवर आधारित होता. या पात्रामागे प्रेरणा होती मीर रंजन नेगी. भारतीय हॉकीचा माजी गोलकीपर. १९८२ च्या आशियाई स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून १-७ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी नेगींवर देशद्रोहाचे आरोप झाले, माध्यमांनी आणि जनतेने त्यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांच्या आयुष्यावर काळोख पसरला. काही वर्षांनी त्यांनी महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी जबाबदारी घेतली. त्यांचं काम, समर्पण आणि विश्वास यांच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने २००२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला! याच वास्तवातून चक दे! इंडियाची कथा जन्माला आली. चित्रपटात कबीर खानवर ‘देशद्रोही’ ठरवण्यात येतो, पण शेवटी तो भारताला जिंकवून आपली ओळख पुनःप्रस्थापित करतो. हेच मीर रंजन नेगींच्या जीवनाचं प्रतिबिंब होतं. त्यावर शाहरुख खान म्हणाला होता “हा चित्रपट फक्त हॉकीबद्दल नाही; तो ‘सेकंड चान्स’ मिळाल्यावर काय करता येतं, हे सांगतो.” “चक दे! इंडिया”नं फक्त एक खेळ दाखवला नाही तर त्याने शिकवलं की, अपयशावर मात करून, समाजाच्या शंकेला उत्तर देत, मेहनत आणि एकतेनं देशाचं नाव पुन्हा उजळवता येतं.
    भारतीय महिला संघाने टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २९८ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने सेमी फायनलनंतर फायनलमध्येही शतक करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. पण शेवटी भारतीय संघाने फायनल बाजी मारत अधुरं स्वप्न साकार केलं. भारतीय महिलांच्या या विजयानं समाजातील जुनी विचारसरणी डळमळवली आहे. आता क्रिकेट हे ‘पुरुषांचं खेळणं’ नाही, तर प्रत्येक भारतीय मुलीच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आज या विजयानं शाळा, गल्ल्या आणि मैदानं नव्या आवाजाने गाजत आहेत. “मी सुद्धा खेळेन, मी सुद्धा जिंकेन!” हा विजय फक्त खेळाचा नाही तर तो आहे समानतेचा, संघर्षाचा आणि ओळख निर्माण करण्याचा विजय. स्वप्ननगरीत जे कधी अधुरं वाटत होतं, ते आज या भारताच्या लेकींनी पूर्णत्वास नेलं.

  • –– प्रवीण बागडे
    नागपूर
    मो.क्र. ९९२३६२०९१९
error: Content is protected !!