धाराशिव – शहराच्या विकासाला गती देणाऱ्या ₹१४० कोटींच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू झालेल्या रस्ते व नाली दुरुस्तीच्या कामांना अचानक स्थगिती देण्यात आल्यानंतर शहरातील महिलांचा संताप उफाळून आला आहे. धाराशिव नागरी कृती समितीच्या माध्यमातून महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन लक्ष वेधले,तसेच उपोषणाला सुरुवात केली आहे. महिलांनी ठामपणे भूमिका घेत, धाराशिवच्या विकासकामांना राजकीय कटकारस्थानामुळे खोडा घातला जात आहे. आम्ही शहराच्या नागरी हक्कांसाठी लढा देणारच,असा निर्धार व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला ₹१४० कोटींचा निधी हा रस्ते आणि नाल्यांच्या दर्जेदार बांधकामासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या कामांना स्थगिती मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने ठाम पाठींबा दर्शविला असून,शहराच्या विकासात राजकीय अडथळे आणणाऱ्यांविरोधात पक्ष ठामपणे उभा राहील,असा इशारा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलनकर्त्या महिलांसोबत भाजपचे कार्यकर्तेही ऐक्याने उभे राहिले आहेत. महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आवाहन केले आहे की,शहराच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि नगरोत्थान योजनेतील कामांची स्थगिती त्वरित उठवावी. धाराशिवच्या नागरी हक्कांसाठी सुरू झालेल्या या महिलांच्या लढ्यात जनतेचा सहभाग वाढत असून,हे आंदोलन व्यापक रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान