September 22, 2026

कळंब बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेचा शुभारंभ

  • सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप
  • कळंब – महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या शेतमाल तारण कर्ज योजना २०२५–२६ अंतर्गत कळंब बाजार समितीत दि.२७ ऑक्टोबर २०२५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला.
    बाजार समिती सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांना धनादेश वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी हनुमंत दा. लांडगे (रा.खोंदला,ता.कळंब) यांना पहिला धनादेश देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
    कळंब बाजार समितीच्या स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उडीद,मुग,सोयाबीन,तूर,चणा व इतर शेतमालावर बाजारभावाच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज केवळ ६ टक्के वार्षिक व्याजदराने उपलब्ध होणार आहे. कर्जाची मुदत सहा महिने ठेवण्यात आली असून, या कालावधीत शेतकरी आपला माल वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित ठेवू शकतात.
    या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा योग्य दर मिळेपर्यंत तो बाजारात न विकता सुरक्षित ठेवण्याची संधी देणे हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या गरजांसाठी कर्ज मिळून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
    कर्जासाठी शेतकऱ्यांना शेतमाल पावती, ७/१२ उतारा,आधार कार्ड आणि बँक पासबुक ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. गोदाम उपलब्ध नसल्यासही ही योजना लागू आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
    या कार्यक्रमास बाजार समितीचे सदस्य,कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
    सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांना तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून त्यांच्या मालाचा योग्य दर मिळेपर्यंत थांबण्याची संधी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुलभ होईल.”
error: Content is protected !!