कळंब – कलोपासक मंडळाच्या वतीने दि.२२ ऑक्टोबर रोजी विठ्ठल मंदिर,कळंब येथे दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात चेन्नई येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक सौरभ नाईक यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोत्यांची मनं मंत्रमुग्ध झाली.हा कार्यक्रम स्व.कमलाकर जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.शोभा पाटील,प्रा.आप्पासाहेब मिटकरी, कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवी नरहिरे, प्रा.सुनील पवार व जीवन रत्नपारखी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.एस.आर. पाटील यांनी स्व.कमलाकर जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यानंतर गायक सौरभ नाईक यांनी राग केदार मध्ये बडा ख्याल व छोटा तराना सादर करून मैफिलीची सुरुवात केली. नाट्यसंगीताच्या विभागात त्यांनी “घेई छंद मकरंद”,“प्रिय हा मिलिंद मधु सेवनानंद”, “ठेव ही ठेवी जपून सुखाते दुःख विना” अशी अनेक लोकप्रिय नाट्यगीते सादर केली. भजन सादरीकरणात “काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग”, “नांदतो केवळ पांडुरंग” या भक्तिमय रचनांनी रसिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे, या भजनांमध्ये पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या अनेक अमर रचनांचा समावेश होता. अखेरीस भैरवी गायनाने मैफिलीचा उत्कर्षबिंदू साधला. साथसंगत म्हणून तेजस धुमाळ (तबला),शशिकांत देशमुख (संवादिनी) व बंकट कुमार बैरागी (पखवाज) यांनी अप्रतिम साथ दिली. कलाकारांचे स्वागत श्रीकांत कळंबकर व अॅड.मनोज चोंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन यशवंत दशरथ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कुलकर्णी,डॉ.गिरीष कुलकर्णी,मच्छिंद्र साखरे,शंकर ताटे,निशा कळंबकर आणि अनिता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड