February 8, 2026

भोगजी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व साहित्य वाटप — पुण्याचे डॉ.संजय व्होरा यांचा माणुसकीचा हात!

  • कळंब — समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून पुण्याच्या ससून रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागप्रमुख डॉ.संजय व्होरा यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी माणुसकीचा हात पुढे केला आहे.त्यांच्या सहकार्याने कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भोगजी येथील १२५ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
    या उपक्रमात डॉ.संजय व्होरा (HOD,न्यूरोसर्जरी विभाग,B. J. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटल, पुणे) आणि डायरेक्टर, न्यूरोसर्जरी अँड EMS, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ. शरदचंद्र घोळवे (रुबी हॉल क्लिनिक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
    शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सुंदर शालेय दप्तर,वही,रजिस्टर, कंपास पेटी,रंगपेटी,आलेख वही, ड्रॉइंग वही,पेन इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड आणि शिवव्याख्याते महादेव खराटे यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.
    कार्यक्रमाच्या वेळी भोगजी गावचे सरपंच,उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य,शिक्षकवृंद, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक डॉ. शिवाजी चव्हाण,सहशिक्षक कालिदास वनवे, बोबडे,डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!