February 8, 2026

खरडलेल्या जमिनींना न्याय मिळावा – आमदार कैलास पाटील यांची मागणी

  • धाराशिव – सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी,अशी ठाम मागणी आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे.ही माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली.
    जुलै ते ऑगस्ट दरम्यान धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,उडीद, मुग,मका,कापूस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली.
    मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच खरडून गेल्या.त्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतीयोग्य जमिनींचेही प्रचंड नुकसान झाले आहे.शासन नियमांनुसार एका हंगामात एकदाच मदत मिळू शकते, त्यामुळे सप्टेंबरमधील नव्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.
    अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीच वाहून गेल्याने त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी लक्षात आणून दिले.तसेच सप्टेंबरमधील अतिवृष्टीत फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्या शेतकऱ्यांनाही पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
    “शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीची योग्य नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे,” असे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले असल्याचे धाराशिव जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी ही माहिती दिली.
error: Content is protected !!