February 9, 2026

‘टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पनेतून तयार शुभेच्छापत्रे पोहोचणार मुख्यमंत्रींपर्यंत

  • कळंब – प्रत्येक दिवाळी एक नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येते, पण कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी अधिकच खास बनवली आहे. शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या या बालकांनी केवळ पुस्तकी ज्ञानातच नाही, तर ‘कार्यानुभव’ विषयाला अर्थपूर्ण रूप देत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित शुभेच्छापत्रे स्वतः तयार केली.
    घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साडीच्या लेस,टिकल्या,रंगछटा व विविध टाकाऊ साहित्याचा वापर करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी सुंदर शुभेच्छापत्रे आणि आकाशकंदील तयार केले. शाळेत भरलेल्या प्रदर्शनात या वस्तू पाहून पाहणाऱ्यांचे डोळे दिपले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ‘मी स्वतः काहीतरी निर्माण केले’ या भावनेचा आनंद पाहण्यासारखा होता.
    सरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी सांगितले की, “शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्वनिर्मितीचा आनंद अनुभवता यावा,हा या उपक्रमामागचा हेतू आहे.”
    उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना लेखणी भेट दिली, तर सहशिक्षक बलभीम राऊत, तुकाराम कराळे,शिवनंदा स्वामी आणि स्वयंसेवक बापू हगारे यांनी परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला.
    या उपक्रमाची सर्वात भावनिक बाजू म्हणजे,विद्यार्थ्यांच्या हातांनी तयार केलेली ही शुभेच्छापत्रे आता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, खासदार,आमदार आणि जिल्हाधिकारी अशा राज्यातील प्रमुख मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहेत.
    आढाळा शाळेच्या या चिमुकल्या कलाकारांनी दाखवून दिले की, शिक्षणाचे खरे सौंदर्य पुस्तकात नाही, तर स्वनिर्मितीत आणि त्यामागील भावनिक प्रयत्नांत आहे. ही केवळ दिवाळीची भेट नाही, तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची बोलकी साक्ष आहे!
error: Content is protected !!