माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा प्रशासनावर गंभीर आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा
कळंब – आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवरून कळंबच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी थेट प्रशासनावरच मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप करत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. “एका विशिष्ट राजकीय पक्षाला जिंकवण्यासाठी बाह्य व बनावट मतदारांची पद्धतशीर नोंदणी करण्यात आली आहे,”असा थेट आरोप त्यांनी प्रशासनावर केला. दि.१२ ऑक्टोबर २०२५ वार रविवार रोजी शहरातील सराफ गल्ली येथील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुंदडा म्हणाले, “नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल २००० हून अधिक मतदारांची नावे बदलून इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे कोणाच्या दबावाखाली करण्यात आले? प्रशासन लोकशाहीची थट्टा करत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या तयार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करून प्रशासन विशिष्ट ‘यंत्रणे’च्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मुंदडा यांनी केला. “मुख्याधिकारी मंजुषा गुरमे व निवडणूक विभागातील काकडे यांनी हरकती स्वीकारण्याच्या प्रक्रियेतही मनमानी केली असून, नियम धाब्यावर बसवले आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. मुंदडा पुढे म्हणाले, “जर बोगस नावे व फेरफार केलेले मतदार तातडीने वगळले नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागणार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत लढवू.” त्यांनी इशारा दिला की, “प्रभागात फेरफार झालेल्या मतदार याद्यांमुळे खरे मतदार मतदानापासून वंचित राहतील, आणि तो लोकशाहीवर थेट हल्ला ठरेल. सर्व राजकीय पक्षांनी या बनावट मतदारयादीविरोधात एकत्र यावे.” पत्रकार परिषदेला नंदकिशोर हौसलमल,गोविंद चौधरी,शंकर वाघमारे आदी उपस्थित होते. प्रशासनाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही,मात्र मुंदडांच्या या आरोपांमुळे कळंबच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन