धाराशिव – आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेच्या निर्देशानुसार दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी “जागतिक अंडी दिन” साजरा केला जातो.या वर्षी या दिनाची थीम “The Mighty Egg: Packed with Natural Nutrition” अर्थात “नैसर्गिक पोषणमूल्यांनी परिपूर्ण असलेले शक्तिशाली अंडे” अशी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अंड्याचे पौष्टिक मूल्य आणि मानवी आहारातील त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना अंड्यांच्या आरोग्यविषयक फायद्यांबद्दल माहिती दिली. अंडी हा उच्च प्रतीचा प्रथिनांचा, जीवनसत्त्वांचा (Vitamins) आणि खनिजांचा (Minerals) उत्तम स्रोत आहे. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच अंड्यातील पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठीही फायदेशीर ठरतात. अंडी हा सर्वात स्वस्त, सुलभ आणि पौष्टिक आहार असल्यामुळे विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांच्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.धाराशिव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये अंडीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अंडी वाटप उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेतून एकूण ३ हजार अंडी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ.मनोज घाटे आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.मुकुंद तावरे यांनी दिली. जागतिक अंडी दिनानिमित्त नगरपरिषद शाळा क्रमांक १८, भानुनगर, धाराशिव येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मुकुंद तावरे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते सघन कुक्कुट विकास गट, धाराशिव संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अंड्यांचे आरोग्यदायी फायदे, त्यातील पोषक मूल्ये आणि दैनंदिन आहारात त्याचा समावेश करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला असून, निरोगी भारताच्या दिशेने एक प्रशंसनीय पाऊल म्हणून या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान