March 26, 2026

एक अनुभव : किल्लारी भूकंपाची आठवण

  • ३० सप्टेंबर १९९३. पहाटेच निसर्गाची अवकृपा झाली. महाभयंकर भूकंपाने गावोगावे जमीनदोस्त झाली.
    पहाटे साडेपाचची झोप संपत आली होती. अचानक जमिनीचा प्रचंड थरथराट सुरू झाला. लाईट गेली. उठावं कसं, बाहेर पडावं कसं, हे कळेना.अंदाज घेत घेत घराचे दार उघडले आणि रस्त्यावर आलो. तेव्हा रस्त्यावर बरीच माणसं जमा झाली होती.
    “भूकंप झाला!!! भूकंप झाला!!!” असा एकच सूर सर्वत्र घुमत होता.सर्व लोक भयभीत अवस्थेत रस्त्यावर आले होते. काय घडलं,किती गंभीर आहे, याची अजून कुणालाही नीट कल्पना नव्हती.
    (मुक्काम पोस्ट कळंब,तालुका कळंब,जिल्हा धाराशिव)
    बाहेरूनच मी पत्नीला हाक मारली “विद्या!!! अगं बाहेर ये!!! भूकंप झालाय… लवकर ये!!”
    निकिता तेव्हा अवघी दीड वर्षांची होती. लेकराला घेऊन बाहेर यावं की आतच राहावं,हे विद्याला कळेना. शेवटी लेकराला पाठीवर टाकून ती घराबाहेर आली.
    कळंब हे ठिकाण भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सव्वाशे किलोमीटर दूर होतं. इथल्या इमारती हादरल्या होत्या, तर मग केंद्राजवळच्या गावांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नव्हती.जिथं भूकंप झाला, तिथं घरं, लेकरं, संसार – सगळं क्षणात मातीखाली गाडलं गेलं होतं. धरतीमातेची लेकरं आता तिच्याच कवेत शांत झोपली होती…
    सर्वत्र ओरड, आकांत, गोंधळ, भीतीचे वातावरण पसरले होते. जनावरे, प्राणी-पक्षीही घाबरून सैरावैरा झाले होते.
    सकाळी दहाच्या सुमारास मी कळंबच्या मुख्य चौकात गेलो, प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ते जाणून घ्यायला. तेथे कॉलेजचे मित्र व आता पत्रकार म्हणून कार्यरत असलेले अशोक शिंदे भेटले. त्यांनी हाक मारली –
    “सर! किल्लारी परिसरात खूप मोठा भूकंप झालाय.हजारो माणसं गाडली गेलीत. त्यांच्या मदतीला ताबडतोब निघायला हवं.”
    त्या वेळी मी माझे गुरु विश्वनाथ तोडकर अण्णांसोबत ‘जाणीव’ या संघटनेत कार्यरत होतो. अशोकला घेऊन मी जाणीवच्या कार्यालयात गेलो.अण्णांशी चर्चा झाली – “कसं जायचं? कोण जाणार? किती लोक जातील? काय व्यवस्था करायची?” यावर भराभर निर्णय घेतला.
    अशोक म्हणाले –
    “अण्णा, तहसीलदार साहेब मोफत एस.टी. बसची सोय करतात. आपण कार्यकर्त्यांना घेऊन जाऊ शकतो.”
    मग आम्ही लगेच तहसीलदार कार्यालय गाठलं. त्यांनी अवघ्या एका तासात एस.टी.ची सोय करून दिली.शहरातील मित्र, संघटनेचे कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार यांनी बिस्किटांचे पुडे, केळी आणि जे मिळेल ते साहित्य गोळा करून दिलं.चाळीस-पन्नास कार्यकर्त्यांसह आम्ही दुपारी एक वाजता किल्लारीच्या दिशेने निघालो.
    संध्याकाळी गावात पोहोचलो, तेव्हा सर्वत्र स्मशान शांतता होती. गावाच्या तोंडाशी पोलिसांचा ताफा उभा होता. गाडीतून उतरल्यावर नजरेला जे दिसलं ते आजही विसरता येत नाही – पायाखालीच प्रेतांची रांग… बाप, आई, लेकरं, आजी-आजोबा – सारे एकत्र मातीखाली गाडले गेलेले…
    आम्ही पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सल्ला दिला –
    “आता मदतीची वेळ नाही. रात्री पाऊस आहे, थंडी आहे. तुम्ही कारखान्यात जाऊन रात्र काढा. सकाळी सहा वाजता आपण मदतीला लागू.”
    मग आम्ही ऊस कारखान्याच्या पत्र्याच्या शेडसमोर एस.टी. उभी केली. पांघरायला काही नाही, उब मिळायला काही नाही. पाऊस कोसळत होता. सर्वजण गाडीतच बसून रात्रीभर पेंगत राहिलो. अडीच-तीनच्या सुमारास आणलेल्या बिस्किटांनी पोटाची आग विझवली. संपूर्ण रात्र कोणत्याही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, फक्त भीती व थकवा होता.
    सकाळी साडेसहा वाजता पुन्हा मूळ गावात पोहोचलो.दोन गट करून मदतीचे काम सुरू केले. सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंत मातीत गाडलेली प्रेतं बाहेर काढून नातेवाईकांच्या किंवा पोलिसांच्या ताब्यात दिली. जी प्रेतं बेवारस होती, त्यांना एकत्र करून अग्नी दिला.
    कष्टामुळे भूक प्रचंड लागली होती. तेव्हा एखादा कार्यकर्ता म्हणाला – “अरे, दूध आणि भात आला आहे. खाऊन घ्या.”
    एक टँकर दुधाचा आणि खिचडीची व्यवस्था झाली होती. हात धुतले, तोंड धुतलं आणि मग पोटभर खाल्लं. त्या दानशूर लोकांची आठवण आजही ताजी आहे.
    सायंकाळी पाचपर्यंत आम्ही किमान तीस-पस्तीस प्रेतांना अग्नी दिला. संध्याकाळी मात्र अनेक लोक मदतीसाठी जमू लागले. आम्ही मात्र थकलेल्या अवस्थेत परतीच्या प्रवासाला निघालो.
    तो दिवस,तो क्षण – आजही मनात घर करून आहे. विसरणं अशक्य आहे. त्यानंतर तीन वर्षे आम्ही त्या भागातील लोकांना शक्य तितकी मदत करत राहिलो. आणि त्यानंतर उमरगा हीच माझी कायमची कर्मभूमी ठरली.
  • ✍️ भूमिपुत्र वाघ
    समाजसेवक,उमरगा,जिल्हा धाराशिव
error: Content is protected !!