धाराशिव – जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. हिंगणगाव खुर्द येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तत्काळ गावाला भेट देऊन मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत जोरदार पाऊस पडत असून अनेक नद्या,ओढे व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगणगाव खुर्द येथील रहिवासी दुर्दैवाने पुराच्या प्रवाहात सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी प्रशासन या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत शासन नियमांनुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील पूरस्थितीचा आढावा घेतला.संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य व बचावकार्य गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान,प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदी-नाल्यांच्या प्रवाहापासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान