इटकुर – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या,नुकसान आणि तातडीच्या मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अतिवृष्टीमुळे शेतकरी,शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घामाने उभे केलेले पीक मातीमोल झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरांचे छप्पर पुराच्या लाटेत वाहून गेले, लेकरांच्या भविष्याचे स्वप्न पाण्याबरोबर वाहून गेले आणि आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर उसळतोय – अशी हृदयद्रावक परिस्थिती गावोगावी दिसून येते, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांची ही करुण कहाणी सरकारला दिसत नाही का? पंचनाम्याच्या प्रतीक्षेत वेळ घालवण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट मदत जाहीर केली पाहिजे. डोळ्यांतले अश्रू आणि बांधावरील हतबलता हे पंचनाम्याविना देखील दिसतेच.” तसेच,आपल्या लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा विश्वासही त्यांनी शेतकरी बांधवांना दिला. या भेटीदरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दयानंद गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड