March 26, 2026

लिंग समभाव कार्यशाळेत शिक्षकांचे सामाजिक दातृत्व

  • कळंब – धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांसाठी युनिसेफ प्रकल्पाअंतर्गत एक दिवसीय लिंग समभाव कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, धाराशिव व गटशिक्षण कार्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय,डिकसळ येथे करण्यात आले.
    या कार्यशाळेत कळंब तालुक्यातील निवडक शिक्षकांनी सहभाग घेतला.
    या प्रसंगी तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या,स्वतः लिंगबदलाचा अनुभव घेतलेल्या, समाज व शिक्षण पद्धतीने नाकारलेल्या,तरीही साहित्य, नाटक व कवितेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या लेखिका, नाटककार व कवयित्री वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता दिशा पिंकी शेख यांनी आपल्या जीवनातील हृदय हेलावून टाकणारे अनुभव मांडले.त्यांनी तृतीयपंथी व इतर वंचित घटकांच्या संघर्षांचे वास्तव समोर ठेवत “लिंग समभाव” ही संकल्पना प्रभावीपणे स्पष्ट केली.
    या प्रशिक्षणात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी आपले प्रशिक्षण उपस्थिती भत्त्याची एकूण रक्कम ८४०० रुपये स्वखुशीने दिशा पिंकी शेख यांना भेट स्वरूपात अर्पण केली. या दातृत्वपूर्ण कृतीमुळे शिक्षकांनी वंचित घटकांसाठी समाजाप्रती असलेली आपली जाणीव, संवेदनशीलता आणि जबाबदारी अधोरेखित केली.
    या कार्यशाळेतून शिक्षकांनी केवळ प्रेरणा घेतली नाही,तर समाजापुढे समर्पण,दातृत्व व सामाजिक जाणिवेचे जिवंत उदाहरण ठेवले आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांचे हे पाऊल एक आदर्श ठरत आहे.
error: Content is protected !!