धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व शासकीय,अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर व रूबेला प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यासाठी १५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेचे शंभर टक्के यश सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ सप्टेंबर रोजी सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक,आरोग्य सहाय्यक व आशा स्वयंसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली.मोहिमेचे उद्दिष्ट शंभर टक्के गाठावे,अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी सांगितले. राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये अलीकडेच गोवरचे रुग्ण आढळल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार असून,यासाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरण सत्रे आयोजित केली जातील.तसेच विशेष लसीकरण पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी दिली. लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाबरोबर महिला व बालविकास,शिक्षण आणि समाजकल्याण विभागांनी समन्वयाने कार्य करावे,हलगर्जीपणा करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले. नागरिकांना वेळेवर व उत्तम आरोग्य सेवा मिळावी,यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी केले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान