धाराशिव (जिमाका)- ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्त्वाचे असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे.विविध विभागांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहोचविणे,ग्रामविकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे तसेच आरोग्य,शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन व पंचायत राज संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान” राज्यभरात राबविण्यात येत असून या अभियानाचा कालावधी १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा आहे.या अभियानात ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या कार्याचे मूल्यमापन करून पुरस्कार देण्यात येणार आहे. या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत “सिद्धाई मंगल कार्यालय”,सोलापूर बायपास रोड,धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी व तालुकास्तरीय विभागप्रमुख उपस्थित राहणार असून कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान