कळंब – सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह अशी ओळख असलेल्या प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कळंब ची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल संतूर कॉन्फरन्स हॉल,कळंब येथे दिमाखात पार पडली.या सभेचे अध्यक्षस्थान बँकेचे चेअरमन प्रा. श्रीधर (बाबा) भवर यांनी भूषविले. या सहकार वर्षात बँकेने भक्कम प्रगती साधली आहे.३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी ₹१०४ कोटी ३५ लाख,कर्जवाटप ₹६१ कोटी ९४ लाख,खेळते भागभांडवल ₹४ कोटी ६३ लाख, तर एकूण व्यवसाय तब्बल ₹१६६ कोटी २९ लाख एवढा झाला आहे. याशिवाय बँकेला ₹१ कोटी ४६ लाखांचा ढोबळ नफा झाला असून नक्त NPA शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे. सभेत बँकेचे दोन नवीन शाखा विस्ताराचेही जाहीर करण्यात आले.भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंजूर झालेल्या केज (जि. बीड) आणि शिराढोण (जि.धाराशिव) येथील शाखा लवकरच ग्राहकांच्या सेवेत सुरू होणार आहेत.तसेच सभासदांना ५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही चेअरमन प्रा.भवर यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर संचालक नानासाहेब इखे,विजयानंद तांबारे,भागवत सुरवसे,विलास आडणे,डॉ.ऋषिकेश भवर,डॉ.साजेद चाऊस,विक्रम गायकवाड,संचालिका सौ.सुप्रिया सोनटक्के,सौ.पुष्पा पवार, तज्ञसंचालक योगीराज लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे व सरव्यवस्थापक आशिष हेड्डा उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक संचालक नानासाहेब इखे यांनी केले,तर वार्षिक अहवाल चेअरमन प्रा. भवर यांनी सादर केला.ज्येष्ठ सभासद डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.सभेचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार संचालक डॉ.साजेद चाऊस यांनी मानले. सभेस बँकेचे सभासद,कर्मचारी व पिग्मी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.एकात्मता, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासामुळेच प्रियदर्शनी अर्बन को-ऑप.बँकेने सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे समाधान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन