व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन मुख्याधिकारी अंधारे यांचा सत्कार
धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी सौ.नीता अंधारे यांचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विविध समस्या, स्वच्छता,कचरा डेपो,कर वसुली तसेच विकास कामांच्या अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वच्छतेबाबत जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्याधिकारी अंधारे म्हणाल्या की,गेल्या दोन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने शहरातील स्वच्छतेची समस्या गंभीर झाली आहे.मात्र,लवकरच त्यावर तोडगा काढून स्वच्छतेचे काम गतीमान करण्यात येईल. धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलवण्या संदर्भात अमजद सय्यद यांनी विचारले असता मुख्याधिकारी सौ. अंधारे यांनी सांगितले की, धाराशिव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता विद्यमान कचरा डेपो लहान पडत असून कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वीच डेपो हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती लवकरच मार्गी लागेल. वडगाव सिद्धेश्वर येथील एमआयडीसी परिसरात नवीन कचरा डेपो प्रकल्पाचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर विद्यमान ठिकाणी बायोमायनिंग खात निर्मिती प्रकल्प राबविण्याचा शासन स्तरावर पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच,नगरपालिकेच्या उत्पन्न-खर्चातील तफावत आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. कर वसुली वाढविण्यासाठी राज्य शासनाची अभय ही प्रोत्साहनपर एक महत्त्वाची योजना असून, याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे त्यात सरासरी 50 टक्के सवलतीसह थकबाकी वसुलीचा लाभ मालमत्ताधारकांना मिळणार आहे. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच शहरवासीयांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे वसुली वाढेल आणि विकासकामांना चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी अंधारे म्हणाल्या की, “मी नुकताच पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण केला आहे. शहरातील विविध भागांचा आढावा घेतला असून जुन्या-नव्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहर व्यवस्थित करण्यासाठी काही काळ लागणार आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास स्वच्छ, सुंदर आणि सुबक धाराशिव घडविण्यास मदत होईल.” व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक प्रजापत्रचे जिल्हा प्रतिनिधी हुंकार बनसोडे आणि दैनिक उज्वलकाळ चे संपादक अरुण गंगावणे यांनी मुख्याधिकारी सौ. अंधारे यांचा सत्कार केला. यावेळी पुढारचे संपादक किशोर माळी, के न्यूजचे संपादक किरण कांबळे, एस पी न्यूज 24 चे संपादक मुस्तफा पठाण, लोकमदत न्यूजचे संपादक अमजद सय्यद आदी पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान