February 8, 2026

गणपती बाप्पा सरकारला सुबुद्धी देवो;शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या! – आमदार कैलास पाटील

  • धाराशिव – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीन, उडीद, मुग, तुर यासह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून तुळजापूर तालुकाही याला अपवाद नाही. या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत शहापूर, निलेगाव,गुजनूर,वागदरी,नळदुर्ग, जळकोट,जळकोटवाडी येथे तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह केला.
    आज गणेशोत्सवाचे आगमन होत असताना आमदार पाटील म्हणाले की, “विघ्नहर्ता गणेश सरकारला सुबुद्धी देवो, बळीराजाला मदत देवो!” एवढे नुकसान होऊनही सरकारकडून तत्काळ मदतीची चिन्हे दिसत नसल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले.
    तुळजापूर तालुक्यात सरासरी 257 मिमी पाऊस नोंदला गेला असून नळदुर्ग महसुली मंडळात 316 मिमी, जळकोट 252 मिमी इतका पाऊस पडून अतिवृष्टी झालेली आहे. पिके शेतात उभी असली तरी पाण्यामुळे त्यांची वाढ खुंटली असून फुलगळ व रोगराई (मुळकुज, मानकुज, शेंगकरपा) मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन घटणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
    “हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामे तात्काळ करून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही. अन्यथा याची जबाबदारी सरकार व प्रशासनावर राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
    शेवटी गणरायाला साकडे घालत आमदार पाटील म्हणाले की, “गणपती बाप्पा सरकारच्या लोकांना व प्रशासनाला सुबुद्धी देवो, बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची शक्ती देवो!”
error: Content is protected !!