February 8, 2026

मोहा येथे पारधी समाज–गावकऱ्यांत वाद; दगडफेकीत पोलिसांसह नागरिक जखमी

  • कळंब – तालुक्यातील मोहा गावात पारधी समाज व ग्रामस्थांमध्ये झालेला वाद दि.२६ ऑगस्ट २०२५ वार मंगळवार रोजी दगडफेकीत परिवर्तीत झाला.या घटनेत पोलिस दलातील तब्बल १५ जवानांसह काही नागरिक जखमी झाले असून एका नागरिकाची प्रकृती गंभीर आहे.या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सौ. रितू खोकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला व गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    गावातील सरकारी दवाखान्यामागील ग्रामपंचायतीच्या जागेवर पारधी समाजातील लोक अंत्यविधी करण्यासाठी आले होते. मात्र,या जागेवर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा पारंपरिक कार्यक्रम व देवीची पालखी येते.ग्रामस्थांनी धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन या जागेवर अंत्यविधी होऊ नये असा आग्रह धरला. यामुळे सोमवारी (दि.२५ ऑगस्ट २०२५ ) पारधी समाज व गावकऱ्यांमध्ये वाद उद्भवला. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
    मात्र,मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी गावात येऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असतानाही दोन्ही गटांत पुन्हा वाद उफाळून दगडफेक झाली.यात पोलिस व ग्रामस्थ जखमी झाले.गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाला तातडीने कळंब उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले,तर इतर जखमींवर मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
    घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौ.रितू खोकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.गावातील तणावाचे वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन ग्रामस्थ व पारधी समाजाशी सतत संवाद साधत आहे.
    या घटनेमुळे मोहा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाने शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!