February 8, 2026

“समाजभूषण पुरस्काराने सोपान पवार सन्मानित”

  • कळंब – श्री संत सेना महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील मराठी विभाग प्रमुख,नवोपक्रमशील शिक्षक,लेखक व कवी सोपान पवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू मंडाळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.अण्णासाहेब बोधले महाराज,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा संघटक प्रेमचंद गोरे,जिल्हा उपाध्यक्ष बापूराव सुरवसे,शहराध्यक्ष प्रमोद करवलकर तसेच ट्रस्ट व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
    सोपान पवार यांनी अध्यापनाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी मराठी विषयासाठी महाराष्ट्र शासन व विविध शैक्षणिक संस्थांतर्फे राज्यस्तर,जिल्हास्तर व तालुकास्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.विद्या प्राधिकरण पुणे तर्फे मास्टर ट्रेनर,तसेच बालभारती पुणे तर्फे पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे.
    पवार यांनी राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून, विविध दैनिके व शैक्षणिक मासिकांत त्यांचे २९ शैक्षणिक लेख,तसेच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यांनी आजवर ३० निबंधलेखन पुरस्कार, विविध नवोपक्रम स्पर्धा पुरस्कार, आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील १६ सन्मान मिळवले आहेत.
    त्यांच्या “गुणवंताची भाषणे”, “निबंध लेखन स्वरूप आणि दिशा”, “निबंध लेखनाची प्रेरणा आणि नव दिशा” या तीन ग्रंथांना विशेष दाद मिळाली आहे.
    साहित्य व शिक्षण क्षेत्राबरोबरच पवार सर कळंब तालुका मराठी अध्यापक मंडळ अध्यक्ष, धाराशिव जिल्हा मराठी अध्यापक मंडळ सदस्य,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला कळंब तालुका अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कळंब कार्याध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या भूषवत आहेत.
    त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.
error: Content is protected !!