कळंब – रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी “पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा” मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमात तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यशाळेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रोटेरियन डॉ.अभिजीत जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रकल्प संचालक रोटेरियन रवि नरहिरे व रोटेरियन डॉ.सचिन पवार यांनी या उपक्रमाचे नियोजन व समन्वय केला.कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रमुख कलाकार शरद आडसुळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मातीपासून मूर्ती घडविण्याची पद्धत,तिचे सांस्कृतिक महत्त्व व पर्यावरणपूरकतेचा संदेश याविषयी मार्गदर्शन केले. कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे प्राचार्य पवनकुमार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित करताना सांगितले की,”गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून संस्कृती व परंपरेचा वारसा आहे. तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे. शाळा अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व सामाजिक जाणीवेला चालना देत राहील.” या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पा साकारला. मातीच्या स्पर्शातून बाप्पाचे रूप आपल्या हातून घडवताना सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद, भक्तिभाव आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून येत होती. कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांनी “स्वतः बनवलेला बाप्पा” घरी नेण्याचा आनंद मिळवला. या प्रसंगी रोटरी क्लबच्या विविध सदस्यांची उपस्थिती होती.सर्वांनी मिळून या उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. रोटरी क्लब व कॅनव्हास स्कूलने या उपक्रमाद्वारे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे.” कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक,कर्मचारी व रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या उपक्रमाचा खरा पुरस्कार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव