कळंब – शहराचा दीर्घकालीन पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल ६८ कोटी रुपयांची भव्य पाणीपुरवठा योजना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे.या योजनेमुळे शहराला पुढील २५ वर्षांसाठी परिपूर्ण व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे संजय मुंदडा यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दि.२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत तत्कालीन नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली योजनेचा ठराव मंजूर झाला.त्यानंतर आमदार कैलास (दादा) पाटील, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे,तत्कालीन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,त्यावेळसचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली.
💧 पाणी आरक्षणात ऐतिहासिक वाढ – योजनेसाठी मांजरा धरणातून पाणी आरक्षण वाढविणे हे मोठे आव्हान होते.सुरुवातीचे 1.49 दलघमी.आरक्षण वाढवून ते तब्बल 2.34 दलघमी.करण्यात आले.त्यामुळे दररोज ८० लाख लिटर पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे.
📝 नगरविकास विभागाची मंजुरी – ही योजना सुवर्णजयंती नगरोत्त्थान योजनेतून नगरविकास विभागामार्फत मंजूर झाली.काहींनी योजना रद्द करण्याचे प्रयत्न केले,तरी आमदार कैलास पाटील व खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयीन समितीकडून निविदेला अंतिम मंजुरी मिळाली.ही निविदा आदित्य कन्स्ट्रक्शन,मुरुड यांना ९.२१ % कमी दराने देण्यात आली आहे.
🔑 योजनेची वैशिष्ट्ये – जलशुद्धीकरण केंद्रातून एकावेळी ५० लाख लिटर शुद्ध पाणी पुरवठा होणार असून एकूण ५४ किमी.लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ९.०६ लाख लिटर क्षमतेची टाकी,कोर्टासमोर ६.९९ लाख लिटर तर पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिर येथे ६.१३ लाख लिटर क्षमतेच्या नव्या टाक्या उभारल्या जाणार. सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश करून विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही सांगितले. या ऐतिहासिक योजनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत,तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, आमदार कैलास (दादा) पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व शिवसेना राज्य समन्वयक नितीन लांडगे यांचे मनःपूर्वक आभार असल्याचे संजय मुंडडा यांनी व्यक्त केले. “कळंब नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवून शाश्वत पाणीपुरवठा योजना साकार होत आहे.हा कळंबकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे संजय मुंडडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख सचिन काळे,शहरप्रमुख विश्वजित जाधव,उपजिल्हाप्रमुख सागर बाराते,उपशहरप्रमुख निर्भय घुले,सदस्य हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव