February 9, 2026

“धाराशिवकरांची सहनशक्ती संपली;१४० कोटींच्या रस्ते कामांची निविदा तातडीने पूर्ण करा – आमदार कैलास पाटील

  • धाराशिव – नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या ५९ रस्ते कामांना तब्बल १८ महिने उलटूनही सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय मंजुरी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मिळूनही निविदा प्रक्रिया रखडत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
    या संदर्भात आमदार कैलास पाटील यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज यांची भेट घेत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. “धाराशिव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करणे अत्यावश्यक आहे,” असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
    दरम्यान,नागरिकांनी ६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते.त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कामे २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आंदोलनानंतर निविदा उघडण्यात आल्या; मात्र त्या जादा दराने मंजूर झाल्याने नगरपालिकेवर ३५ ते ४० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला असता.महाविकास आघाडीच्या आमरण उपोषणानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपामुळे कंत्राटदार अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार झाले.
    तरीसुद्धा राज्यस्तरीय समितीची अंतिम मंजुरी न मिळाल्याने प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. परिणामी, शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांना खड्डे, चिखल आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे.
    आमदार पाटील यांनी सचिवांकडे स्पष्ट मागणी केली की – “१४० कोटींच्या रस्ते कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामांना प्रत्यक्ष गती द्या, अन्यथा धाराशिवकरांचा उद्रेक अटळ आहे.”
error: Content is protected !!