- नऊ हेक्टर 40 आर क्षेत्र होणार संपादीत
धाराशिव, दि. 12 –
शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात शेतकरी संघटना व स्थानिक शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच धाराशिव जिल्ह्यातील महाळंगी गावात मोजणीचा टप्पा 100 टक्के पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील 13 गटधारक शेतकर्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी स्वेच्छेने आपली जमीन देण्यास संमती दिली होती. महाळंगी शिवारातील नऊ हेक्टर 40 आर एवढे क्षेत्र शक्तीपीठ महामार्गासाठी संपादीत केले जाणार आहे. या संपूर्ण क्षेत्राची मोजणी मंगळवारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे.
नागपूर-गोवा या 802 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गासाठी आठ हजार 615 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी आठ हजार 149 हेक्टर जमीन खाजगी मालकीची आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेला विरोध केला होता. दुसरीकडे स्वेच्छेने जमीन देणार्या शेतकर्यांना बाजारभावाव्यतिरिक्त 25 टक्के अतिरिक्त बोनस देण्याची शिफारस कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर जिल्ह्यातील काही गावांंमधून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकर्यांचा होकार मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्यांतील 19 गावांतील 468 हेक्टर जमिनीचे भूसंपादन या महामार्गासाठी केले जाणार आहे. यात धाराशिव तालुक्यातील 17 आणि तुळजापूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. यात नितळी गावातील 79 गटधारक शेतकर्यांकडून 55 हेक्टर, चिखली गावातील 94 गटधारक शेतकर्यांकडून 47 हेक्टर तर तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी या गावातील 49 गटधारक शेतकर्यांकडून 49.66 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या तिन्ही गावात मोठ्या प्रमाणात जमिनीचे भूसंपादन होणार असल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांचा या महामार्गाला मोठा विरोध आहे. असे असतानाही धाराशिव तालुक्यातील महाळंगी गावातील 13 गटधारक शेतकर्यांनी स्वेच्छेने आपली जमीन देण्यास जिल्हा प्रशासनाकडे संमती दिली होती. त्यानुसार महाळंगी शिवारात मंगळवारी धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, उपअधीक्षक भूमि अभिलेख मोरे यांच्या उपस्थितीत 100 टक्के मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चावडीवर मोजणीपत्रकाचे शेतकर्यांसमोर जाहीर वाचनही करण्यात आले. त्यानुसार महाळंगी येथील 9 हेक्टर 40 आर एवढे क्षेत्र शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केले जाणार आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य