कळंब – कळंब-लातूर मार्गावरील खडकी (ता. कळंब) गावाजवळील अरुंद पुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातात प्रशांत महाजन व मंगेश महाजन या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. “अपघात होऊनही संबंधित गुत्तेदार,अभियंता व कंत्राटदारांवर अद्याप कारवाई न झाल्याने प्रशासनच त्यांच्या पाठीशी आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “आता रस्त्यावर उतरावं लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. रामा-२३६ कळंब-लातूर मार्गावरील हे काम गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर यांच्यामार्फत सुरू आहे. रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असली तरी पुलांचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, पुलाजवळ कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. या घटनेनंतर आमदारांनी १० मे २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देवून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याआधी कार्यकारी अभियंता लातूर (२१ जून २०२४) व अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई (३० जुलै २०२४) यांना देखील लेखी निवेदने सादर केली होती. परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
🛑 कारवाईचा पत्ता नाही! अपघातानंतर कळंब पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. मात्र त्या अहवालावर कोणती कारवाई झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
🛑 #JusticeForRamesh सोशल मीडियावर ट्रेंड करंजकल्ला गावाजवळील वळण ओळखता न आल्याने रमेश होनराव याचा जागीच मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर #JusticeForRamesh हा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कळंब-शिराढोण-लातूर मार्गावरील धोकादायक वळणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले