मुंबई – स्थानिक जिल्हा माथाडी मंडळांना जिवंत करून माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी म्हणून मुंबई कामगार आयुक्त कार्यालयावर शेकडो माथाडी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. माथाडी कायदा बचाव कृतीसमिती व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे वतीने आयोजित या उपोषणात राज्यातील खानदेश,मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मुंबई विभागातून शेकडो माथाडी कामगारांनी उपोषणात सहभाग घेतला. पोलिसांनी ऐनवेळी मनाई हुकूम बजावल्या नंतर ही माथाडी कामगारांनी ठरल्याप्रमाणे उपोषण सत्याग्रह पार पाडला. राज्यातील माथाडी मंडळ ठप्प झाल्याने,माथाडी कामगारांची नोंदणी,वेळेवर पगार होणे, मालकाकडील थकबाकी वसुली, वेतन वाढीचे करार,वेळोवेळी शासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी,शासकीय धान्य गोदामातील हमालांचे प्रश्न खाजगी बाजार समित्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी, साखर कारखाने व कापूस फेडरेशन मध्ये कायद्याची अंमलबजावणी,१० – १५ वर्ष आर आर सी ची वसूली न करणे, माथाडी मंडळांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे या प्रश्नाबरोबरच मालकांच्या दबावामुळे कायद्यात केलेले बदल सरकारने तत्काळ मागे घ्यावेत म्हणून यावेळी कामगार आयुक्तांकडे आग्रह धरण्यात आला. कामगार आयुक्त डॉ.एच.पी. तुम्मोड यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस कामगार सह आयुक्त शिरीन लोखंडे,माथाडी कामगार संघटनेचे आ.शशिकांत शिंदे,बळवंतराव पवार,पोपटराव देशमुख,महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे,उपाध्यक्ष राजकुमार घायाळ,साथी विकास मगदूम, हनुमंत बहिरट,अप्पा खताळ, पुणे बाजार समितीचे संचालक साथी संतोष नांगरे,गुलाबराव जगताप,अरुण रांजणे,दिपक रामिष्टे,निवृत्ती धुमाळ,सुरक्षा रक्षक संघटनेचे लक्ष्मणराव भोसले,प्रकाश पाटील,राजन म्हात्रे,इ.ची प्रमुख उपस्थिती होती. माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागवार बैठका घेतल्या जातील,तसेच आजच्या बैठकीत उपस्थित प्रश्न कामगार मंत्र्यांचे कानावर घालून त्यांच्याबरोबर ही लवकरात लवकर बैठक घेतली जाईल असे आश्वासन कामगार आयुक्तांनी दिले. या लाक्षणिक उपोषणात पुणे हमाल पंचायतचे गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर,हुसेन पठाण, चंदन कुमार,ओंकार मोरे, कोल्हापूरचे कृष्णात चौगुले,धुळे येथील भागवत चितळकर,बीड येथील रामभाऊ बादाडे,शेख मुस्तफा,सोलापूर येथील शिवाजी शिंदे,भीम सीताफळे,ऍड.राहुल सावंत,अहिल्यानगर येथील गोविंदराव सांगळे,रवींद्र भोसले, इ.प्रमुख सहभाग होता.
More Stories
येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला
नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी