August 8, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जन्माने हिंदू असले तरी ते धर्मनिरपेक्ष राजे होते – इतिहास अभ्यासक डॉ.शिवानंद भानुसे

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माने हिंदू असले तरी त्यांच्या राज्यात सर्वधर्मसमभाव होता.आणि ते धर्मनिरपेक्ष राजे होते.असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ.शिवानंद भानुसे यांनी केले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन कळंब २०२५ ( जि.धाराशिव) येथे ११ एप्रिल २०२५ रोजी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुस्लिम विषयक धोरण आणि वर्तमान या विषयावर बोलत होते.ते या परिसंवादाचे अध्यक्ष होते.
    डॉ.शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की,छत्रपति शिवाजी महाराजांनी रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. मात्र त्यांना गो-ब्राह्मण प्रतिपालक असे दाखविण्यात येते.जर शिवाजी महाराजाना फक्त गो-ब्राह्मण प्रतिपालक होते तर राज्याभिषेकाला विरोध कोणी केला ? अफजलखानचा कोथळा काढला त्यावेळेस अफजलखान याचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवरायांवर तलवारीने वार केला. शिवाजी महाराज त्यातुन बचावले. मात्र शिवाजी महाराजांनी नंतर त्याचे दोन तुकडे केले. जसे शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम होते. तसे मोगल व इतर सर्वच शत्रू सोबत हिंदूही होते. हे धर्मयुद्ध नव्हतं.
    अफजलखान मारला आपले वैर संपले. त्याची कबर बांधली. असे शिवाजीराजे मुसलमान विरोधी कसे असू शकतात? त्याकाळी चारी बाजूंनी मुस्लिम राजे होते. त्याच्या विरोधात युद्ध होते. ते धार्मिक युद्ध नव्हते. छत्रपति शिवाजी महाराज हे सर्व जाती, धर्मातील लोकांना बरोबर घेउन चालणारे राजे होते.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम व इतरही सरदार होते. आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महाराजांना गुणी माणसांची उत्तम रीतीने पारख करता येत होती. मग तो गुणी माणूस कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात कधीही माणसांची जात पाहून नियुक्ती, पदोन्नती किंवा निलंबन केलेले नाही. त्यांच्या या गुणांमुळे अनेक मुसलमान स्वराज्याच्या प्रशासनात सर्वोच्चस्थानी विराजमान झाल्याचे दिसून येते. शिवाजी महाराजांचे नाव काढताच हिंदू विरूध्द मुसलमान असे चित्र रंगविले जाते. परंतू वास्तविक पाहता शिवाजी महाराजांचा लढा हा दुष्ट, अत्याचारी, जुलमी राज्यकर्त्यांविरूध्द होता. लोककल्याणासाठी होता. सामान्य मुसलमानांविरूध्द कधीच नव्हता. उलट स्वकीयांनी ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराजांविरूध्द हत्यार उचलले त्या त्या वेळेस ते हत्यार स्वतःच्या छातीवर झेलण्याचा प्रयत्न अनेक निष्ठावंत मुसलमान सरदारांनी केलेला आहे.
    अलीकडल्या काळात जात, धर्म, भाषा याचा वापर राजकारणासाठी करण्याचं प्रस्थ भलतंच वाढत चाललं आहे. आपल्या स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी वेगवेगळे भावनिक पातळीवर विषय उपस्थित करून समाजात दुही माजवण्याचे प्रकारही रोजच्या रोज घडताना दिसत आहेत. त्यातून मग जनमानसात वैमनस्य निर्माण होऊन प्रसंगी त्याचं रूपांतर हिंसाचारात होत आहे. याला विद्यमान सरकार जबाबदार आहे. विकासाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. हे असल्या प्रकारचं विद्वेषाचं समाजकारण, राजकारण करण्यासाठी कायमच इतिहासातील थोर पुरुष आणि त्यांच्या विचारधारा यांना विकृत वळण देण्याचं काम केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला एवढे टक्के मुस्लिम, एवढे अंगरक्षक, असं फुगवून, अवास्तवही सांगणे योग्य नाही.
    इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. असेही डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले. या परिसंवादात अरुण रेणके, सरफराज अहमद यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक खा.ओमराजे निंबाळकर, स्वागताध्यक्ष आ.कैलास घाडगे पाटील, संमेलनाध्यक्ष मधू कांबळे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय कांबळे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे, प्रा.केशव हमने आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादाचे प्रा. जगदीश गवळी यांनी सूत्रसंचालन केले तर वर्षा जाधव यांनी आभार मानले.
error: Content is protected !!