कळंब – “विज्ञान आणि गणित आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या जीवनाला नवा दृष्टिकोन लाभू शकतो,” असे विचार माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी व्यक्त केले. त्या कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, कळंब येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवि नरहिरे होते. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणाधिकारी सुधा साळुंके उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,संस्थापक सौ.आशा नरहिरे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र स्वामी,विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी यरमुनवाड, मुख्याध्यापक एस.आळंदकर, भारत देवगुडे,संतोष माळी, सुशील फुलारी,दत्तप्रसाद जंगम, आणि केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव व्यासपीठावर उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग आवश्यक – साळुंके पुढे म्हणाल्या की, “तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. प्रत्येक पाच वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होतात. विद्यार्थ्यांनी या बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी व समाजाच्या विकासासाठी करायला हवा. मात्र, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यास अधोगती अटळ आहे. म्हणूनच प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य पद्धतीने करण्याची सजगता ठेवावी.” या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र स्वामी, आणि दत्तप्रसाद जंगम यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष माळी यांनी केले. सूत्रसंचालन सौ.अर्चना बाविकर यांनी प्रभावीपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन सुशील फुलारी यांनी मानले. येणारा काळ खगोलशास्त्राचा – नरहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना रवि नरहिरे म्हणाले, “आयटी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानांमुळे जगभरात मोठी क्रांती घडली आहे. येणाऱ्या काळात खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञान हे क्षेत्र झपाट्याने विकसित होईल. त्यामुळे भविष्यातील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत तयार राहणे आवश्यक आहे.” शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, तंत्रज्ञानाचे योग्य महत्त्व समजावणे, आणि त्याचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करण्याचा संदेश देणे, हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले