August 10, 2025

” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” उपक्रमाचे उद्घाटन

  • धाराशिव (जिमाका)- तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या उपक्रमाचे उद्घाटन आज ७ जानेवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी ह.मा.ढाकणे,समाजभुषण पुरस्कारप्राप्त विजय गायकवाड,मुख्य लिपीक मोतीलाल तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयांशी जोडणे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणे आहे.हा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवला जात असून यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.
    शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रंथालय भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.जेणेकरून त्यांना ग्रंथालयांच्या कार्यप्रणालीची ओळख होईल.तसेच सामूहिक वाचन कार्यक्रम, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळा तसेच लेखक आणि विद्यार्थ्यांमधील संवादासाठी विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाच्या विविध पैलूंची माहिती मिळेल. हा उपक्रम महाविद्यालये,विद्यापीठे आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही असणार आहे.या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद तसेच पुस्तक परीक्षण आणि कथाकथन स्पर्धा यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथ प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे.यावेळी विद्यार्थी वाचक,कार्यालयातील कर्मचारी कठाडे,राठोड,शिसोदे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!