धाराशिव (जिमाका) – धारशीव तालुक्यातील वर्ग २ मधील मदतमाश जमिनी वर्ग १ मध्ये करण्याचे कामकाज करण्यासाठी तालुकास्तरीय समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.सह दुय्यम निबंधक हे सचिव तर जमाबंदी विभागाचे सहाय्यक महसूल अधिकारी व धाराशिव शहराचे मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी समितीचे शिबिर सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे.२५ डिसेंबर रोजी बुधवारी ख्रिसमसची शासकीय सुट्टी असल्याने या दिवशीचे शिबिर गुरुवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. या शिबिरात शेतकऱ्यांच्या वर्ग २ मधील जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कोणत्या कागदपत्रांची त्यासाठी आवश्यकता लागणार आहे याबाबत माहिती देण्यात येईल. याविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे समाधान करण्यात येणार आहे.शिबिरात समितीचे सचिव व सदस्य हे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखासह उपस्थित राहणार आहे.शेतकऱ्यांकडून वर्ग २ मधील जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी प्राप्त प्रस्तावाची समिती तपासणी करून परिपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवच्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
More Stories
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा परिषदेत ‘सरप्राईज’ निकाल;कळंब तालुक्याची लॉटरी – दोन सभापती पदांवर झेंडा!
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी