August 9, 2025

माय वर्ल्ड सोसायटीची कोजागिरी झाली काव्य मैफिलीने गोड

  • छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर येथील जालना रोड वरील चिकलठाणा परिसरातील, विमानतळासमोर असलेल्या माय वर्ल्ड वसाहत या उच्चभ्रू सोसायटी मध्ये कोजागिरीच्या निमित्ताने कवींची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली होती. या काव्य मैफिलीत काव्य सादरीकरण करण्यासाठी सहा सुप्रसिद्ध कवी उपस्थित होते. यामध्ये अप्रतिम सूत्रसंचालन करणारे डॉ.सुशिल सातपुते यांनी मैफिलीची धुरा लीलया पेलली. प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावणाऱ्या सामाजिक कवितांची तिजोरी असलेले राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित झालेले कवी विजयकुमार पांचाळ यांच्याही कवितांची मेजवानी मिळाली.आपल्या गोड गळ्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कवयित्री,गझलकर सौ.सुनिताताई कपाळे यांच्या मनोवेधक आवाजाने काव्य मैफिलीत गोडवा निर्माण केला, त्यांच्या कविता ऐकून रसिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.तसेच “लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा” असं म्हणत कवी रोहिदास शिखरे यांनी नात्यांच्या वेलीला काव्य सुमनांनी रंग भरत गगनापर्यंत पोहचवले.शरद पौर्णिमेच्या चंद्राला प्रेम कवितेच्या माध्यमातून प्रेमाचा गुलाबी रंग देऊन वातावरणात प्रेमसरींची बरसात करणारे कवी दिपक नागरे यांनी देखील काव्य मैफिलीत चार चांद लावण्याचा प्रयत्न केला.तसेच कवी संदेश वाघमारे यांच्या पहाडी आवाजाने ‘घराला दार का नाही’ या कवितेने काव्य मैफिल जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
    या सर्व साहित्यिकांनी आमच्या सोसायटी मध्ये येऊन बहीण,लेक,बाप,शेतकरी,आई अशा भावनिक कविता सादर करून आम्हा सामान्य रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला असे मत सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी,सदस्य यांनी व्यक्त केले. सुदंर व्यवस्था असल्याने शेवटपर्यंत काव्य मैफिलीत श्रोत्यांची उपस्थिती कायम राहिली.कविता ऐकत असताना रसिक मंत्रमुग्ध झाले.
    सोसायटीमधील लहान बालके, तरुण तरुणी,गृहिनी तसेच ज्येष्ठ पुरुष मंडळी उपस्थित राहिल्याने मैफिल बहारदार झाली.काव्य मैफिल सुरु असताना कोजागिरीच्या चविष्ठ दुधाची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आल्याने कार्यक्रमात उत्साह ओसंडून वाहत होता.उत्कृष्ट निवेदन करणारे डॉ.सुशिल सातपुते यांनी मनोरंजक पद्धतीने निवेदन करून सर्वांना हसायला भाग पाडले त्याच प्रमाणे ‘बरं झालं बाप्पा ‘ या कवितेसोबत त्यांच्या निवेदनाच्या शैलीवर सोसायटीमधील सर्वजण खूप खुश झाले.असा बहारदार कार्यक्रम सोसायटी मध्ये प्रथमच आयोजित केला आणि सर्व सोसायटी आनंदित झाली. दरवर्षी या कवींना बोलवून अशी प्रबोधनात्मक मैफिलचे आयोजन करावे अशी सोसायटीतील सर्वच लोकं चर्चा करत असल्याचे निर्दर्शनास आले.आयोजक या नात्याने कवितेतून सामाजिक प्रबोधन करण्याचा सुंदर प्रयत्न केल्याने मानसिक समाधान तर मिळालेच परंतु सोसायटी मध्ये चांगला उपक्रम राबविल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आम्ही यशस्वी झालो असे मत सर्वच चेअरमन,पदाधिकारी यांनी मांडले.
    शेवटी काव्य मैफिलीत उपस्थित असलेले साहित्यिक बांधव यांचा सोसायटीच्या वतीने यथोच्छ असा सन्मान करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले या बहारदार काव्य मैफिलींची सांगता करण्यात आली. या मैफिलीच्या यशस्वी आयोजनात सोसायटीतील रहिवासी युवराज देशमुख तसेच डॉ.मोहिनी देशमुख यांनी विशेष योगदान दिले.
error: Content is protected !!