August 9, 2025

अतिवृष्टीने बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

  • धाराशिव (जिमाका) – गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,असा नुकसानबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी,असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दि.४ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक हॉलमध्ये अतिवृष्टीने शेतीच्या नुकसानीचा आढावा पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत घेतला.यावेळी ते बोलत होते.
    बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सहभागी होते.
    पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की,सन २०२३ मध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पिक विमा कंपनीने अनेक गैरसोयीची कामे केले आहेत. कंपनीकडून देण्यात येणारे रकमेचे धनादेश हे चुकीच्या पद्धतीने आणि कमी रकमेचे दिले होते.मात्र यावेळी पिक विमा वाटप करताना शेतकऱ्यांना समान व व्यवस्थित वितरण होईल या दृष्टीने काम करावे. विमा कंपनीकडून देण्यात येणारी रकमेचे धनादेश याची पडताळणी करून घ्यावी.ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी पेंडिंग आहे त्याची केवायसी तात्काळ करून घ्यावी. असेही ते म्हणाले.रब्बी हंगाम सध्या सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत तसेच बोगस खत विक्री होणार नाही याची दक्षता ही प्रशासनाने घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहे.
    जिल्ह्यात गाव तेथे स्मशानभूमी हे अभियान राबवण्यात येत आहे.या अभियानाचा आढावाही पालकमंत्री डॉ.सावंत यांनी यावेळी घेतला.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्धारित वेळेत हे काम करण्याचे निर्देशही दिले.तसेच जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
    जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन जिल्ह्यातील ज्या ४२ हजार ६३८ महिलांचे बँक खाते आधार संलग्न करणे बाकी आहे, ते आधार संलग्न करून त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.या महिलांच्या बँक खात्यात १० ऑक्टोबरपर्यंत दोन महिन्याची रक्कम जमा होईल याचे नियोजन करावे.यासाठी जिल्ह्यातील संबंधित बँकेत सोमवारी व मंगळवारी शिबीर आयोजित करावे असे निर्देशही पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी यावेळी दिले.
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी दिली.जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ मंडळात अतिवृष्टी झाल्याचे सांगून जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ४३४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कळविण्याचे माने यांनी सांगितले.
error: Content is protected !!