धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय “आविष्कार” संशोधन व नाविन्यता स्पर्धेचे आयोजन दि. १० ऑक्टोबर रोजी विद्यापीठ उपपरिसरात करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमधील सुप्त नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्कार व्हावा, त्यांच्यामध्ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्यांना अधिछात्रवृत्तीच्या स्वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे २००६ पासून ‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा राज्यस्तरीय ‘आविष्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जानेवारी २०२५ मध्ये संपन्न होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून कुलगुरू प्रा.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय आविष्कार अधिवेशनाचे आयोजन करून त्यानंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संपन्न होणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील संशोधन कल्पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी यावर्षीचा आविष्कार प्रथमत:जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे.दि.८ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना आणि १० ऑक्टोबरला बीड व धाराशीव येथे संपन्न होत आहे. यासाठी नोंदणी चालू आहे. ज्ञानशाखानिहाय सहा गट : पहिला गट – मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला,दुसरा गट – वाणिज्य,व्यवस्थापन व विधी, तिसरा गट- विज्ञान,चौथा गट- कृषी व पशुसंवर्धन,पाचवा गट – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि सहावा गट – औषधनिर्माणशास्त्र यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे तीन स्तर आहेत जसेकी पदवी (युजी), पदव्युत्तर पदवी (पीजी) आणि पदव्युत्तर पदवीनंतरची पदवी (पोस्ट पीजी).यात भाग घेण्यसाठी वयोमर्यादा पदवी- वय वर्ष २५, पदव्युत्तर पदवी- ३० आणि पोस्ट पीजीकरिता वयोमर्यादा नाही.धाराशिव जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. आनंद देशमुख,डॉ.सादीक बागवान आहेत.सदर अविष्कार हा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रा.वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर, संचालक प्रा. प्रशांत दिक्षित यांच्या मार्गदर्शनात होत आहे. यामध्ये अधिकाधिक महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे,आविष्कारचे समन्वयक डॉ.भास्कर साठे, संयोजक डॉ.सुयोग अमृतराव, डॉ.महेश माने यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान