स्त्रियांच्या बाबत कित्येक पुरुषांच्या तोंडून एक वाक्य ऐकले असेल , “चालणारा थकतो पण वाट थकत नाही .” स्त्री कामोत्सुक असते ,तिचं समाधान होत नाही . एक तर निर्जीव गोष्टीशी तिची तुलना , घाणेरडी मानसिकता असलेल्या लोकांनो त्या निर्जीव सडकेची सुद्धा वर्दळीमुळे दुरावस्था होते . स्त्रियांच्या अत्यंत नाजूक भागाबद्दल आंबटशौकीन लोकं फारच कामशास्त्रातील ज्ञान असल्या प्रमाणे अक्कल पाजळत असतात . खालच्या पातळीची मानसिकता बळगणारांनो स्त्री अतृप्त रहाते तुमच्याकडे असलेल्या सेक्सच्या अर्धवट ज्ञानामुळे आणि कौशल्याचा अभाव असल्यामुळे ……तिची कामेच्छा खूप मोठी आहे म्हणून नव्हे . पुरुषी मानसिकता …बलात्कारी लोकांची मानसिकता खूपदा स्त्री यात आनंद घेते अशीच असते .आपण तिच्या मागे लागावे म्हणून ती तयार होते ,मेक अप करते आणि बलात्कार केल्यावर तिला पण आनंद मिळाला अशी नीच मानसिकता असते. गुन्हेगारांची मानसिकता तपासताना एका गुन्हेगाराला प्रश्न विचारला गेला की तुला बलात्कार केल्याचा पाश्चाताप नाही का झाला .त्याने उत्तर दिले ,“तिने पण आनंद घेतला की , मी बलात्कार करतांना तिची योनी ओली झाली होती .” फक्त कामोत्सुक झाल्यानंतरच नाही अत्यंत घाबरल्या नंतर पण स्त्रीची योनी ओली होते .पण हे भूक आणि मैथुन याच्या पलीकडेच न गेलेल्या जनावरांना काय कळणार . एकदा स्त्री मेल्यावर कितीही मेणबत्त्या जाळल्या तरी काय होणार किंवा गुन्हेगाराला शिक्षा मिळाली तरी काय होणार ?जोपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवली जात नाही जोपर्यंत नवीन निर्भया निर्माण होत रहाणार .मेडिकल ,इंजिनिअरिंग , डी एड इ.कॉलेज कुठे असतात मुख्य वस्ती पासून 2/3 किलोमिटर अंतरावर .मध्ये निर्जन रस्ता .काय सुरक्षा व्यवस्था असते त्या रस्त्याला ? ना लाईटची सोय ,ना CCTV कॅमेरे,ना पोलिसांची गस्त . किती पालक एकत्र येवून अशा संस्था किंवा पोलिस मधील महिला दक्षता विभागाकडे त्यांच्या मुलींच्या सुरक्षेची मागणी करतात? एखाद्या मुलीची छेडछाड होत असेल तर किती मुली एकत्र येवून त्याला विरोध करतात ? मुलं एकत्र येतात सामुहिक आत्यचार करतात .मुलींना पाहिले आहे का एकत्र येताना ? किती मुली तक्रार नोंदवायला जातात ? त्यावर काय action घेतली जाते ? किती वेगाने घेतली जाते ? प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये मुलींना त्रास देणारी मुलं असतात काय करतात तिथले शिक्षक,प्राध्यापक ?कोणती ॲक्शन घेतात ? त्यावेळी पालकांची प्रतिक्रिया काय असते ?आपली मुलं बिघडे पर्यंत पालक काय करत असतात ? मुलींना फक्त कराटे शिकवले की प्रश्न सुटायला हा दाक्षिणात्य सिनेमा आहे का ? ब्लॅक बेल्ट झालेली मुलगी किती जणांना मारू शकते ? कारण 4 जणांना मारून स्वसंरक्षण करायला तिला कमीत कमी ब्लॅक बेल्ट होणे गरजेचे आहे . ब्लॅक बेल्ट झालेल्या मुलीची ताकद चार आडमुठ्या ,हिंस्त्र नरांपुढे टिकेल असं तुम्हाला वाटतं ? फार जुजबी ठिकाणी त्याचा वापर होईल . मुलींना ,महिलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण एवढ्या मोठ्या आणि भयानक घटना घडूनही दिले जात नाही .शक्ती पेक्षा युक्ती जास्त उपयोगी पडेल संकटातून सुटण्यासाठी….आपल्या भोवती काय घडत आहे ,आपण काय केले पाहिजे ? याबद्दल किती महिला आणि मुली सतर्क असतात ? आपण बुक केलेल्या कॅब/रिक्षा मध्ये कोणी अगंतुक पुरुष येवून बसले तर आपण बसले पाहिजे का ?,आपल्यावर कोणी पाळत ठेवून आहे का ? आपल्या पालकांना आणि संबंधित सुरक्षा व्यवस्थेला त्याची माहिती मुली देतात का ? खूपदा असं आढळून येतं की शाळा ,कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी होणारा त्रास घरी पालकांना मुली सांगत नाहीत.दुर्लक्ष करतात ,सहन करतात आणि समजा पालकांना सांगितला तरी त्यांनी समजून घेण्याची शक्यता कमी . मुलींचे एखाद्या बदमाश किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती सोबत अफेअर होऊन पण त्यांनी फसवून दूर नेल्यामुळे सुद्धा वाईट घटना घडतात . प्रेम ,सेक्स ,दुष्ट प्रवृत्ती ,फसवणूक ,सुरक्षितता या सगळ्या गोष्टींवर पालकांची मुलींशी चर्चा झाली पाहिजे .त्यांच्यावर दडपण न आणता आणि त्यांना जज न करता . मुलींचे संरक्षण आपल्याला नेमके कोणापासून करायचे असते ? पुरुषांपासूनच ना ? पुरुष बायकांच्या उदरातून जन्म घेतो त्याला घडवत न्यायचे पण स्त्रीच्या हातात असते .तरी पण ती योग्य पुरुष घडवू शकत नाही .तेंव्हा स्त्रीची स्त्री म्हणून स्वतःकडे आणि इतर स्त्रियांकडे बघण्याची प्रवृत्ती तपासली पाहिजे .तिचाच स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोण हिणकस असेल तर मुलांमध्ये पण तेच उतरणार . एका शिक्षिकेच्या मुलाने शेजारच्या मुलीची छेड काढली .तक्रार केल्यानंतर शिक्षिकेच्या उत्तर होते , “लकडलेल्या बोरीलाच लोकं दगड मारत असतात.” तिचा मुलगा वाया गेला हे सांगायला नकोच . मणिपूर मध्ये मुलींची नग्न धिंड काढली त्यातील एका मुलाच्या आईची प्रतिक्रिया काय होती ,“माझ्या मुलाचा मला अभिमान आहे . स्वतःच्या धर्मासाठी त्याने हे केले” विनेश फोगाट,साक्षी मलिक सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू जेंव्हा लैंगिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवतात तेंव्हा आपल्या देशातील काही महिला त्यांनाच बदनाम करतात. दुःख काय असतं ते त्याच आई वडिलांना माहित ज्यांच्या मुलीची जिवंत पणी चिरफाड झाली आणि त्या लेकराचा छिन्न विच्छिन्न देह पहायची वेळ त्यांच्यावर आली . त्या लोकांना आई वडील होण्याचा अधिकार नसला पाहिजे जे डुकराप्रमाणे फक्त मुलं हळजून आणि फक्त त्यांना खाऊ घालून मोठं करतात .संस्कार देणं होत नसेल ,मुलांना वळण लावता येत नाही . समाजाला कलंक आहेत असे आईवडील. आपण मुलींवर बलात्कार करून तिच्यावर सुड उगवत आहोत ,त्यांची जिरवत आहोत हे पुरुषांना तोपर्यंत वाटत राहिलं जोपर्यंत बलात्कार झालेल्या मुलीला ,स्त्रीला समाज सहज स्विकारणार नाही .ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी त्यांना मिळणारा लैंगिक छळाचा राक्षसी आनंद त्यांना मिळणे बंद होईल . समाजात एखादी घटना घडल्यावर जागे होण्या आधी मुलींच्या संपर्कात रहा .त्यांना धाक लावण्यापेक्षा त्यांना समजून घ्या .आपला मुलगा बाहेर काय करतो यावर लक्ष ठेवा ,तो कोणत्या मुलांच्या संपर्कात आहे ते पहा .तुमच्या वंशाच्या दिव्याने दुसऱ्याच्या घराला आग लागणार नाही ते पहा . स्त्री सुरक्षित ठेवणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन