August 9, 2025

शिराढोण येथील सहाय्यक अभियंत्याची कामांमध्ये चालढकल: ग्रामपंचायत कार्यालयाचे गंभीर आरोप

  • शिराढोण (आकाश पवार यांजकडून )- कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामपंचायत कार्यालयाने सहाय्यक अभियंता यांच्यावर कामांमध्ये टाळाटाळ करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे व ग्रामसेवक करपे साहेब यांनी निवेदनाद्वारे या तक्रारींना वाचा फोडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्यांनी फोन उचलत नाहीत. तसेच, त्यांचे सहकारी देखील ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.
  • शिराढोण येथील महाजन वस्ती आणि लमान तांडा येथे मागील तीन दिवसांपासून सिंगल फेज वीज उपलब्ध नाही. तसेच, थ्री फेज वीज देखील दोन ते तीन दिवसांपासून बंद आहे. दिनांक १३ जुलै २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाने गावांतर्गत खराब झालेले पोल बदलण्याबाबत अर्ज दिला होता, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गावातील सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी इंजिनियर कॉल करतात, परंतु अभियंता साहेब फोन न उचलता दुर्लक्ष करतात.
  • या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाने उपकार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ, कळंब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. गावकऱ्यांच्या मते, सहाय्यक अभियंता आणि त्यांचे कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात.
  • शिराढोण येथील ग्रामपंचायत कार्यालयाने या विषयावर थेट भूमिका घेतली असून, येथील नागरिकांच्या समस्यांची त्वरित सोडवणूक करण्याची मागणी केली आहे. अभियंता कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत, याची गंभीर दखल घेतली जाण्याची गरज आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
error: Content is protected !!