August 9, 2025

नवनिर्वाचित संस्था पदाधिकाऱ्यांनी देशीकेंद्र महाराज यांच्या पावन स्मृतीस्थळाला केले अभिवादन

  • लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर न्यासाच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सं. क. कुलकर्णी (धर्मदाय सहआयुक्त, छत्रपती संभाजी नगर) यांच्या नियंत्रणाखाली दि. ०२/०५/२०२४ रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेची निवडणूक संपन्न झाली. या सर्व नवनिर्वाचित संस्था पदाधिकाऱ्यांनी पाचशे घर मठ संस्थान, लातूर येथील देशीकेंद्र महाराज यांच्या पावन समाधी स्थळाला संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदिनाथ सांगवे आणि सचिव माधवराव पाटील (टाकळीकर) यांनी पुष्पहार घालून दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजय रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बसवराज (राजू) येरटे, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक अँड.काशिनाथ साखरे, संचालक प्रा.जी.एम. धाराशीवे, माजी प्राचार्य डॉ. काशिनाथ साखरे, प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार आणि पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची पायाभरणी देशीकेंद्र महाराजांनी केली त्यांचे स्मरण करण्यासाठी आपण त्यांच्या समाधीस्थळावर आलेलो आहोत त्यांनी सन १९४२ साली माधवकरी (भिक्षा) मागून समाजातील गरजू आणि गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केली. या वस्तीगृहातून नामवंत डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांनी आपल्या पूर्णपणे समर्पित भावनेतून केलेल्या कार्यामुळे निर्माण झालेले आहेत. देशीकेंद्र महाराजांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची वचने आणि मानवी तत्वज्ञान आपल्या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजामधील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाड्यातील पहिली प्रेस देशीकेंद्र विद्यालयांमध्ये सुरू केली आणि आजही ती प्रेस अत्यंत उत्तम पद्धतीने जतन करून ठेवण्यात आली आहे. देशीकेंद्र महाराजांनी सन १९७१ला समाजातील सामाजिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना एकत्र करून गरजू आणि गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पवित्र कार्य समर्पित भावनेतून करण्यासाठी ही संस्था सुपूर्त केली. निजामकालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा देशिकेंद्र महाराजाचे निजाम वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन घेतले जायचे. सन १९४७ मध्ये पुणे येथे स्व. मोतीलालजी नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये देशीकेंद्र महाराजांनी केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी स्वतःहून केला होता असे दैनिक केसरी मधून प्रकाशित झालेल्या वृत्ताची माहिती सुद्धा त्यांनी या प्रसंगी दिली. तसेच देशीकेंद्र महाराजांनी आपले स्वतःचे घर, शेती व इतर मौल्यवान वस्तू समाजासाठी दान दिल्या असून त्याचा याचा योग्य विनियोग व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आज त्यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या विधायक कार्याची आपल्याला सातत्याने आठवण येणे हे स्वाभाविक आहे. आपण सर्वजण त्यांच्या कार्याला विनम्रपणे अभिवादन करूया असेही ते यावेळी म्हणाले.
    यावेळी देशीकेंद्र महाराजांचे समाधी स्थळाचे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सहकार्याने सुशोभीकरण केले जाईल आणि बेलपत्री स्मशानभूमी सुद्धा स्वच्छ करून त्याचेही सुशोभीकरण केले जाईल असे सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी ठरविले.
error: Content is protected !!