लातूर (दिलीप आदमाने) – कुठल्याही भाषेला धर्म नसतो. भाषा ही धर्म विरहित असते परंतु आपण भाषेची जोड धर्मासोबत लावलेली आहे. बनारस येथे संस्कृत भाषेचे विद्यापीठ, अलिगड येथे उर्दू भाषेचे विद्यापीठ आणि हिंदी भाषेचे विद्यापीठ वर्धा येथे आहे. मात्र पाली भाषा ही ज्ञान भाषा असून सुद्धा पाली भाषेचे विद्यापीठ कुठेही नाही त्यामुळे पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या संस्थेच्या ७५ एकर जमिनीवर पाली भाषा विद्यापीठाची लवकरच निर्मिती केली जाईल याला शासनाची मान्यता सुद्धा लवकरच मिळेल असे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खू संघ आणि बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महाराष्र् आणि कामगार दिनानिमित्त त्यांना प्राचार्य कक्षामध्ये श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अॅड. श्रीकांतप्पा उटगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भंते बुध्दशील, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, केशव कांबळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे आणि डॉ. टि. घनश्याम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले की,पाली भाषा ही आराधनेची भाषा नसून ती ज्ञान भाषा आहे. तिच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान आहे. भाषा ही कुठल्याही धर्माची नसते तर ती मानवी व्यवहाराच्या देवाण-घेवांनीसाठी असते. भाषा ही ज्ञान संपादन करण्यासाठी असते आणि तिची एक वेगळी गरिमा असते. जपान, थायलंड, कोरिया या देशांमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्या कामामध्ये व्यस्त असतात. विशेषत: महिलांची संख्या या देशांमध्ये अधिक असून त्या उद्योगात कार्य करतात. देशांमध्ये समृद्ध शेती, संपन्न आरोग्य, मुबलक पाणी उपलब्ध असून भ्रष्टाचाराला थारा नाही त्यामुळे मानवी जीवन सुखी आणि समृद्ध आहे. देशांमध्ये संघर्ष, भांडणे, परस्पर मतभेद आणि वादविवाद ह्या गोष्टी दिसून येत नाही. प्रत्येकामध्ये विनम्रता आणि समाधान असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा प्रसन्न राहतो असे सांगून महाराष्र्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे संचालक अँड. श्रीकांतप्पा उटगे यांनी डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे स्वागत करून त्यांना पाली विद्यापीठाच्या निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी केले तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मानले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे