लातूर ( दिलीप आदमाने ) – विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, लोकशाही समाजव्यवस्था, सामाजिक न्याय, शिक्षण, त्याग आणि शील या वैश्विक मानवी मूल्याचा अंगीकार केल्यावरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज परिवर्तन आपल्या देशात निर्माण करता येईल असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा.देवदत्त सावंत यांनी केले. श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील एमसीव्हीसी सभागृहामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती दिनाचे औचित्य साधून “ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, प्रा. कल्याण कांबळे, डॉ. आनंद शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले आणि कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांच्या बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे बोलताना प्रा. देवदत्त सावंत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. भारत हे राष्ट्र व्हावे यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर मोठा संघर्ष केला. समाजात समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी अहोरात्र कष्ट केले असे सांगून कावळा आणि कोल्ह्याची कथा सांगून त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. यावेळी प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हर्षोल्लासामध्ये आपण साजऱ्या करतो. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहोत असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे विश्वव्यापी आहे. त्यांनी समाजातील तळागाळातील शोषित, पीडित, गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने अहोरात्र प्रयत्न करून संपूर्ण देशाला एक नवी शैक्षणिक संजीवनी दिली त्यामुळेच त्यांची जयंती ही संपूर्ण विश्वामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते. आजच्या व्याख्यानाला कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समाजकार्य विभागातील विद्यार्थी यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शनाला सर्व मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती उत्सव समितीचे प्रमुख प्रा. धोंडीबा भुरे यांनी केले तर आभार डॉ. घनश्याम ताडेवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला अँड. सुरेशचंद्र सलगरे, प्रा.प्रशांत उघाडे यांच्यासह कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समाजकार्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव बेंदरगे, रंगनाथ लांडगे, कृष्णा कोळी, बालाजी डावकरे, अशोक शिंदे, योगेश मोदी, राजाभाऊ बोडके, भीमाशंकर सुगरे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे