होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत विद्याभवन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
कळंब – मुंबई येथे पार पडलेल्या डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंबच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा लौकिक उंचावला आहे.या स्पर्धेत विद्यार्थी उदय काळे याने रौप्यपदक तर कु.शाश्वती मडके हिने कांस्यपदक पटकावत मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात विद्यार्थ्यांचा शाल,पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार होते.प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर, उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही. एस.,पर्यवेक्षक श्रीमती जे.एन. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक शिक्षक डी.बी. पवार,बचाटे आर.आर.,सुरज मडके,विनोद सागर,संजय मडके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.तसेच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झालेल्या वसुंधरा नांगरे,विनय शिंदे व विवेक शिंदे यांचाही गौरव करण्यात आला. डॉ.अशोकराव मोहेकर बोलताना म्हणाले की,”नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे.विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर न करता प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान आत्मसात केले पाहिजे.विज्ञान स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची जिज्ञासा,संशोधन वृत्ती आणि नवोन्मेषी विचार विकसित होतात.उदय आणि शाश्वती यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांचे नसून संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. पुढील काळात या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून संस्थेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे,”अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा.अंजलीताई मोहेकर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्पर्धेच्या युगात सातत्य आणि मेहनत यांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पवार यांनी केले,तर आभार प्रदर्शन सुशील कुमार तीर्थकर यांनी मानले.यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्याभवन हायस्कूलचा गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत असून,या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
आंबेडकरी विचारांचा प्रभाव; कुणाल जगतापची सैनिक स्कूल साताऱ्यात झेप
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत जाधव तर उपाध्यक्षपदी यश बनसोडे