कळंब – छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथील बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी आत्माराम बिक्कड हिची महाराष्ट्र पोलिस दलात धुळे येथे निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात तिचा उत्साहात सत्कार करण्यात आला. कळंब नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत माने यांच्या हस्ते कु. वैष्णवी बिक्कड व तिचे वडील आत्माराम बिक्कड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ.सुनंदा कापसे म्हणाल्या,“मुलींनी आपल्या जीवनात मोठे ध्येय ठेवून त्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत.कोणतीही परिस्थिती अडथळा न ठरता,तिची जाणीव ठेवून जिद्दीने पुढे जात राहिल्यास यश नक्की मिळते.कु.वैष्णवी बिक्कड हिने हे सिद्ध करून दाखवले असून तिचा आदर्श इतर विद्यार्थिनींनी घ्यावा.” कु.वैष्णवी बिक्कड हिने कठोर परिश्रम,जिद्द आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवून महाविद्यालयासह कळंब शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
आंबेडकरी विचारांचा प्रभाव; कुणाल जगतापची सैनिक स्कूल साताऱ्यात झेप
कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच काळाची गरज – डॉ.अशोकराव मोहेकर