पनवेल– ARTFX स्कूल ऑफ ॲनिमेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या पनवेल आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच परिसर सुशोभीकरणासाठी एक उपयुक्त आणि सामाजिक जाणीव वाढवणारा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत पनवेल आगारामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक आणि सूचना फलक उभारण्यात आले आहेत.त्यामुळे प्रवाशांना आगारात सहजपणे मार्गदर्शन मिळणार असून,त्यांचा वेळ वाचण्यास आणि गैरसोय टाळण्यास मोठी मदत होणार आहे. पनवेल आगारात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असतात.अनेक वेळा योग्य माहिती अभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.ही बाब लक्षात घेऊन ARTFX स्कूल ऑफ ॲनिमेशन यांनी पुढाकार घेत हा उपक्रम हाती घेतला.“प्रवाशांना पनवेल आगारामध्ये अधिक स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावेत, जेणेकरून त्यांना योग्य दिशा व माहिती सहज मिळेल,”असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी पनवेल आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच वाहतूक नियंत्रण अधिकारी सतीश नलावडे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत,अशा प्रकारचे उपक्रम सार्वजनिक ठिकाणांसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. प्रवाशांना योग्य दिशा व माहिती मिळावी यासाठी उभारण्यात आलेले हे फलक विशेष उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अजय अंकुश पाटील (संचालक,ARTFX स्कूल ऑफ ॲनिमेशन) यांचा पनवेल आगार प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सतीश नलावडे यांनी त्यांना सन्मानित करून या उपक्रमासाठी कृतज्ञता व्यक्त केली.या सन्मानामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. या उपक्रमात ARTFX स्कूल ऑफ ॲनिमेशनचे सहकारी सतीश पाटील, झाकीर सोठिया, संचिता सचिन भंडारी आणि गणेश पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. फलकांची रचना आणि मांडणीही आकर्षक व समजण्यास सोपी ठेवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पनवेल आगार अधिक सुव्यवस्थित,स्वच्छ आणि प्रवाशांसाठी अनुकूल बनत आहे. केवळ सुशोभीकरणापुरता मर्यादित न राहता, हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक प्रयत्न ठरत आहे.भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून सार्वजनिक ठिकाणांचा विकास साधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
More Stories
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात