कळंब –चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त कळंब शहरात दि.२६ मार्च २०२६ वार गुरुवार रोजी रोजी अत्यंत प्रेरणादायी व विचारप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील “विरंगुळा” सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बौद्धाचार्य सुनील गायकवाड यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की,सम्राट अशोक यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे कलिंगचे युद्ध होय.या युद्धात लाखो लोकांचा बळी गेला,हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली.या रक्तपाताने व्यथित झालेल्या अशोकाच्या मनात मोठा परिवर्तन घडले.त्यांनी हिंसा,क्रौर्य आणि विस्तारवादी धोरण सोडून अहिंसा,करुणा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्यांनी गौतम बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार करून समाजात शांतता,समता आणि बंधुतेचा संदेश देण्याचे महान कार्य सुरू केले. बौद्धाचार्य गायकवाड यांनी सांगितले की,अशोकाने बुद्धांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ८४ हजार बौद्ध स्तूप उभारले,तसेच संपूर्ण भारतासह परदेशातही धम्मदूत पाठवून बौद्ध धम्माचा प्रचार केला. त्यांनी पुढे नमूद केले की,सम्राट अशोक यांचे राज्यकारभार केवळ राजकीय नव्हते,तर ते सामाजिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित होते.त्यांनी प्रजेला न्याय,समानता आणि सुरक्षिततेची हमी दिली. धर्म,जात,पंथ यापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांसाठी एकसमान न्यायाची भूमिका घेतली. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा संदर्भ देताना गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,आज जगभर अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. या युद्धांमध्ये निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत,अर्थव्यवस्था ढासळत आहे आणि मानवी मूल्ये धोक्यात येत आहेत.अशा वेळी जगाला युद्धाची नव्हे,तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे.अहिंसा, प्रेम,करुणा आणि समता या तत्वांमुळेच खऱ्या अर्थाने जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकते,असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास सुमित रणदिवे, शिवाजी शिरसाट,राजाभाऊ गायकवाड,मुकेश गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुद्ध अनुयायी व सम्राट अशोक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनीही आपले विचार मांडत अशोक आणि बुद्धांच्या शिकवणीचा समाजात प्रसार करण्याची गरज व्यक्त केली.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान