March 21, 2026

लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य

  • धाराशिव (जिमाका) – राज्यातील महिलांच्या आर्थिक व आरोग्य स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेस गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात विशेष “समाधान कक्ष” स्थापन करण्यात आले आहेत.
    राज्यात महिलांमधील ॲनिमियाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असून, श्रमबलातील महिलांचा सहभाग केवळ २८.७० टक्के इतकाच असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दि.२८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
    जिल्ह्यातील अनेक पात्र महिलांनी अर्ज सादर केले असले तरी त्यांच्या बँक खात्यांचे आधारशी संलग्नीकरण न झाल्यामुळे योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठीच समाधान कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
    प्रशासनाच्या वतीने सर्व महिला लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की,त्यांनी आपल्या संबंधित तालुक्यातील प्रकल्प कार्यालयात जाऊन समाधान कक्षातील कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे.तसेच,ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत मोबाईल व आधार कार्डची छायांकित प्रत घेऊन स्वतः उपस्थित राहून आधार संलग्नीकरण प्रक्रिया पूर्ण करावी.
    यासोबतच,जिल्ह्यातील सर्व बँकांना ही प्रक्रिया मोहिम स्वरूपात राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांनीही लाभार्थ्यांना बँकेत जाण्यास व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे,असे सांगण्यात आले आहे.
    दरम्यान,ज्या लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया प्रलंबित किंवा त्रुटीपूर्ण आहे, त्यांनी दि.३१ मार्च २०२६ पर्यंत ती पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर विनाविलंब जमा होण्यास मदत होणार आहे.
    अध्यक्ष,जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी सर्व लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!