धाराशिव (जिमाका)– माहे एप्रिल व मे या कालावधीत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी काही महत्त्वाच्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.चहा,कॉफी व मद्यपान टाळावे,सैल व सुती कपडे वापरावेत तसेच कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना उन्हात उभ्या वाहनात सोडू नये,अनवाणी बाहेर पडू नये आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे.डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरणे, पुरेसे पाणी पिणे तसेच ताक,लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.घरातून बाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे व ताजे अन्न सेवन करणेही महत्त्वाचे आहे.घर हवेशीर ठेवण्यासाठी खिडक्या-दारे उघडी ठेवावीत तसेच एकटे राहणाऱ्या वृद्ध व आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळणेही गरजेचे आहे.उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे,रिकाम्या पोटी बाहेर पडू नये,दीर्घकाळ उन्हात राहणे टाळावे तसेच तिखट, मसालेदार व शिळे अन्न सेवन करू नये. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.एअर कंडिशनर किंवा कूलरमधून थेट उन्हात बाहेर पडणे टाळावे. कामगार व मालकांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.कामाच्या ठिकाणी गार पाण्याची सोय करावी,कामगारांनी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे तसेच प्रत्येक तासाला किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी.उन्हापासून बचावासाठी शेडची व्यवस्था करावी व शक्यतो बाहेरील कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी करावीत.स्थानिक हवामानाच्या माहितीसाठी रेडिओ,टीव्ही व वृत्तपत्रांचा आधार घ्यावा तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करावी किंवा कामाचा वेग कमी करावा. उष्माघाताची लक्षणे म्हणून डोकेदुखी,ताप,उलट्या,जास्त घाम येणे,बेशुद्ध पडणे, अशक्तपणा,शरीरात पेटके येणे व नाडी असामान्य होणे यांचा समावेश आहे.अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला सावलीत झोपवून कपडे सैल करावेत,द्रव पदार्थ व कैरीचे पन्हे द्यावे तसेच थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात पशुधनाचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरायला सोडावे,गोठे हवेशीर ठेवावेत तसेच छपरावर पांढरा रंग किंवा चुना लावून उष्णता परावर्तित होईल याची काळजी घ्यावी.गोठ्याभोवती झाडे लावणे, पाण्याचे फवारे,स्प्रिंकलर्स व पंख्यांचा वापर करणे तसेच पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कडक उन्हात जनावरांना बाहेर सोडणे टाळावे, गरम पाणी पाजू नये तसेच जनावरांना गर्दीत बांधू नये,असेही निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीराचे तापमान वाढणे,बेशुद्ध होणे,भ्रमित होणे किंवा घाम येणे बंद होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य
“गंगाधर करंडकातून कलावंतांना मोठे व्यासपीठ” – विशाल शिंगाडे
गॅस व इंधन टंचाईच्या अफवा निराधार;नागरिकांनी संयम राखावा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार