March 17, 2026

रमजान निमित्त ‘एहसास’ची माणुसकीची उब;१५० राशन किट,सहरी टिफिन व रमजान टाइमटेबल कार्डचे वाटप

  • कळंब – पवित्र रमजान महिन्यानिमित्त कळंब येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एहसास फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरजू कुटुंबांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे सुमारे १५० रमजान राशन किटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना रमजान महिन्यात मोठा दिलासा मिळाला.
    वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना आपला उपवास (रोजा) सुखाने करता यावा आणि अन्नासाठी वणवण करावी लागू नये,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.वितरित करण्यात आलेल्या राशन किटमध्ये महिनाभर पुरेल इतके गहू,तांदूळ,तेल,डाळी,साखर, चहापत्ती तसेच रमजानसाठी खास खजूर यांचा समावेश होता.
    एहसास फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करून खऱ्या गरजू कुटुंबांची निवड केली आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या किटचे वितरण केले.कळंब तालुक्यातील विविध गावांमध्ये २० ते ३० राशन किट गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले.या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती तसेच स्थानिक तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदवून ‘एहसास’ची जाणीव जपण्याचा प्रयत्न केला.
    या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मभेद न करता मदत करण्यात आली. मुस्लिम समाजाबरोबरच काही गरजू हिंदू बांधवांनाही रमजान राशन किटचे वाटप करण्यात आले.गरज आणि परिस्थिती पाहून समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे हा फाउंडेशनचा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
    याशिवाय संपूर्ण रमजान महिन्यात बाहेरगावाहून रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, ज्यांना सहरीची व्यवस्था करणे शक्य होत नाही अशा गरजूंना सहरी टिफिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.तसेच नागरिकांना उपयुक्त ठरावे या हेतूने रमजान टाइमटेबल कार्डचेही वितरण करण्यात आले.

  • या सामाजिक उपक्रमासाठी अनेक दानशूर नागरिकांनी जकात,सदकात आणि ताऊन (सहकार्य) स्वरूपात आर्थिक मदत दिली.विशेष म्हणजे मुस्लिम समाजाबरोबरच अनेक हिंदू बांधवांनीही उदारपणे सहकार्य केले, त्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबविणे शक्य झाले.
    याबाबत एहसास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमन इसाक शेख म्हणाले की,समाजातील गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रमजान महिन्यात दानशूर नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला. समाजात बंधुता व एकोप्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने आगामी काळात दिवाळी सणानिमित्त गरजू हिंदू बांधवांसाठीही दिवाळी राशन किट वाटप करण्याचा मानस आहे.
    एहसास फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असून या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या उपक्रमासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.
error: Content is protected !!