मोहा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे विविध उपक्रमांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा कार्यक्रम मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘सा.साक्षी पावनज्योत’चा आदर्श संस्थामाता कै.सुमनबाई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे वितरण करण्यात आले.
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लिमिटेड,मोहा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार असे विविध उपक्रम पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना मोहेकर उद्योग समूहाचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांनी महिलांच्या प्रगतीविषयी विचार मांडले.ते म्हणाले की,आजच्या काळात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.शिक्षण,उद्योग,प्रशासन, विज्ञान तसेच सामाजिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रगतीपथावर असून समाजात वेगळी ओळख निर्माण करत आहेत.ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी व्हायचे आहे आणि प्रगती साधायची आहे,अशा महिलांसाठी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट कायम पाठीशी उभी राहील,अशी ग्वाही त्यांनी दिली. महिलांनी शिक्षण,आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर स्वतःची प्रगती साधून समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा संदीप मडके यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला पाहिजे,असे प्रतिपादन केले.मांसाहेब जिजाऊ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी समाज परिवर्तनासाठी कार्य केले पाहिजे.इतिहासातील महान स्त्रियांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या महिलांनी समाजात नवे आदर्श निर्माण करावेत,असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘सा. साक्षी पावनज्योत’चा आदर्श संस्थामाता कै.सुमनबाई मोहेकर स्मृतिदिन विशेषांक उपस्थित महिलांना वितरित करण्यात आला.यावेळी सन्मानित महिलांना विशेषांक,ट्रॉफी,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच महिलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा जसे की संगीत खुर्ची व उखाणा स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.शेखर गिरी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट लिमिटेड संस्थेचे संचालक भारत जोशी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,प्राचार्य अविनाश मोरे, निर्मलाताई मोहेकर,जिल्हा परिषद सदस्य रुपाली नागटिळक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.प्रतिभा सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील माता-भगिनी,विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
More Stories
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
एनएमएमएसमध्ये ज्ञान प्रसार विद्यालयाचा झंझावात;३३ विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी