धाराशिव (जिमाका)–आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी गॅस,पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अखंड व सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच तेल-गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी पुजार यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश दिले.इंधन साठा,वाहतूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन संभाव्य अडचणी वेळेत दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल व एलपीजी पुरवठ्याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात १४९ पेट्रोल पंप कार्यरत असून विविध कंपन्यांच्या २७ गॅस एजन्सी कार्यरत आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीत पेट्रोल पंप व गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.जर अशा ठिकाणी गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित पोलिस निरीक्षकांशी समन्वय साधून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,असेही सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. घरगुती गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्या ठिकाणी धाड टाकून साठा जप्त करून नियमांनुसार कडक कारवाई करावी,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.प्रत्येक तालुक्यात घरगुती गॅस वितरणाबाबत तसेच शिल्लक साठ्याबाबत नियमित आढावा घेण्याचेही ठरविण्यात आले. औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या मागणीची नोंद संबंधित जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकारी यांच्याकडे करावी,असे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी शासनाच्या edlpg@bharatpetroleum.in, indanecareho@indianoil.in आणि lpg.sbu.head@hpcl.in या ई-मेल आयडीवर मागणी नोंदवता येणार असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात तुळजापूर व येरमाळा येथे होणाऱ्या यात्रांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व व्यावसायिकांना लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदारांनी तालुक्यातील मागणीचा आढावा घेऊन ती जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत सर्व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तालुक्यातील घरगुती गॅस वितरण व्यवस्था,उपलब्ध साठा तसेच केलेल्या तपासणी कारवाईचा आढावा घेण्यात आला.तसेच पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गॅस वितरणाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,समाज कल्याण अधिकारी एस.ए.लमकाने,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे,शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पी.एम.पांडे,निमा अध्यक्ष डॉ.पंकज शिनगारे,एमएएनजीए वे.अ.अध्यक्ष डॉ.एस.बी.बलकंडे, FOGSI धाराशिवचे सेक्रेटरी डॉ.आय.के.मुल्ला,आयएमए धाराशिवचे डॉ.सचिन देशमुख,जिल्हा गॅस एजन्सी समन्वयक रिझवान पटेल,इंडियन ऑईलचे सेल्स ऑफिसर प्रकाश राठोड तसेच एचपीसीएल ऑईलचे सेल्स ऑफिसर लिखित रेड्डी आदी उपस्थित होते.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलिसनामा
खेळाडूंना दिलासा! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू; घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र मिळणार
इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त