March 13, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन

  • मुंबई – राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असून काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेषतः दुपारनंतर आभाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते.
    सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा,खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलाचा प्रभाव जाणवू शकतो.काही ठिकाणी विजांचा कडकडाट,जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच काही भागांत गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
    हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे नुकसानीचा धोका वाढू शकतो.
    यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा त्यावर ताडपत्री अथवा प्लास्टिकचे आच्छादन करावे,असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.तसेच शेतीतील साधने,जनावरे आणि इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याबाबतही खबरदारी घ्यावी.
    पुढील काही दिवस हवामानाचा अद्ययावत अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करावीत,असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
error: Content is protected !!