March 13, 2026

खेळाडूंना दिलासा! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू; घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र मिळणार

  • धाराशिव (जिमाका) – राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये मिळणाऱ्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे.ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून आता खेळाडूंना घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
    या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी जलद गतीने होणार असून बनावट प्रमाणपत्रांना आळा बसणार आहे.ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नसल्याचे क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे.
    २४ तासांत पडताळणी अहवाल
    या पोर्टलवर खेळाडूंनी आपली माहिती भरल्यानंतर ती मूळ अभिलेखांशी जुळल्यास अवघ्या २४ तासांत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो.त्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेळाडूंना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही.
    QR कोडद्वारे त्वरित सत्यापन
    प्रत्येक डिजिटल प्रमाणपत्रावर स्वतंत्र QR कोड देण्यात येणार आहे. हा QR कोड स्कॅन करून नियुक्ती प्राधिकारी — जसे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा पोलीस भरती विभाग — प्रमाणपत्राची सत्यता त्वरित तपासू शकतील.
    भरतीसाठी ई-प्रमाणपत्र अनिवार्य
    आगामी सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नसल्याची सूचना देण्यात आली आहे.
    ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा कार्यालयाकडून प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली आहे, त्यांनीही पुढील शासकीय किंवा निमशासकीय भरतीसाठी अर्ज करताना या नव्या प्रणालीद्वारे ई-प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.
    पोर्टलवर नोंदणी आवश्यक
    अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Our Services’ मधील ‘5% Reservation’ या टॅबमध्ये जाऊन एक वेळ नोंदणी करावी. नोंदणी करताना आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी,आधार कार्डची पीडीएफ प्रत तसेच क्रीडा स्पर्धेत मिळवलेले प्रावीण्य प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
    ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहेत त्या खेळाडूंनी तात्काळ या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन घरबसल्या पडताळणी केलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!